एकीकडे देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, शिंदे – फडणवीस साहेब आहे बढो तर दोन पाऊलांच्या अंतरावर इडी सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणांनी ठाणे स्थानक परिसर गजबजून गेला आहे. वेदांत समूहाचा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने ठाणे शिवसेनेच्या वतीने स्थानकात सरकार विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते स्थानकात परिसरात जमले आहेत. तर त्याला लागूनच भाजपा कडून मोदींच्या जन्मदिनानिमित्त मोदींनी केलेल्या विकासकामांचा भला मोठा फलक लावून त्याचे अनावरण करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते जमले आहेत.

यावेळी दोन्ही बाजुंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी स्थानकात बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त भाजपा कडून देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती सांगणार मोठा फलक लावण्यात आला आहे. त्याच्या अनावरनासाठी भाजपचे कार्यकर्ते स्थानक परिसरात जमले आहेत. तर त्याच्या बाजूलाच शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. वेदांत समूहाचा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने सरकारच्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा : ठाणे : भिवंडीत पाच वर्षांची मुलगी वाहून गेली

मात्र यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे स्थानक परिसराला अगदी राजकीय आखाड्याचे रूप आले आहे. पन्नास खोके एकदम ओके, खोके सरकारचा निषेध अशा घोषणा शिवसैनिक देत आहेत तर देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, शिंदे – फडणवीस साहेब आगे बढो अशा घोषणा भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. दोन्ही पक्षांच्या या घोषणाबाजीमुळे स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.