ठाणे : ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करत हाती घेतलेला ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटिस) वेगवेगळ्या अडथळ्यांनंतर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘सॅटिस’साठीच्या वेगवेगळ्या परवानग्यांचा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ‘सॅटिस’ची शिल्लक कामे मार्गी लावण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरील या महत्त्वाच्या स्थानकातून रोज साडेसात लाख प्रवासी ये-जा करतात. स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. त्याच धर्तीवर ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून स्थानकाच्या पूर्वेला २६० कोटी रुपये खर्चाच्या सॅटिस पुलाची उभारणी करण्यात येत आहे.

हेही वाचा – ठाणे : मद्यपी वाहन चालकावर कारवाई केल्याने वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांकडून मारहाण

या प्रकल्पाच्या कामाचा कार्यादेश पालिकेने २०१९ मध्ये ठेकेदार कंपनीला दिला. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु ही मुदत उलटून गेल्यानंतर प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचा आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला होता. रेल्वेच्या जागेत होणाऱ्या कामांसाठी प्रशासनाची मंजुरी आवश्यक होती. यामुळे पालिकेने हा प्रस्ताव रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडे पाठविला होता. मात्र, या विभागाने आराखड्यात सुचवलेल्या बदलानुसार पालिकेने सुधारित आराखडा तयार केला होता. त्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली.

या जागेवरील रेल्वे विभागाची बांधकामे, शौचालये तसेच इतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बराच कालावधी लागला. गेले काही महिने स्थानकाच्या पूर्वेला डेक उभारणीचे काम वेगाने सुरू असले तरी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन हे काम दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात डेकचे एका बाजूचे काम करून तो प्रवाशांसाठी खुला केला जाईल. डेकला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे कामही पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळांवरील पूलजोडणीचे काम शिल्लक आहे. या कामालाही लवकरच सुरुवात होईल. आता वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल.

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला महिला तिकीट कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण; तिकिटाच्या सुट्ट्या पैशावरून वाद

प्रकल्प असा

  • या प्रकल्पात तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर, एमजेपी कार्यालयापर्यंत एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग.
  • यात १२ मीटर रुंद मार्गिका. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी ९ हजार चौरस मीटर डेक उभारणी.
  • डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात ‘स्टेशन बिल्डिंग’चाही समावेश असेल.
  • डेकच्या तळघरात दुचाकी व चारचाकींसाठी वाहनतळ.

पूर्तता आणि नियोजन

  • कोपरी पुलाशेजारी रेल्वेरुळाच्या दोन्ही बाजूच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण.
  • पुलाच्या जोडणीसाठी सहा ओव्हरहेड वायर खांबांच्या जागांच्या बदलांना रेल्वे विभागाची मंजुरी.
  • खांब स्थलांतरणाचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी १ कोटी ९० लाख रुपये रेल्वे विभागाकडे जमा
  • या कामासाठी रेल्वे विभाग निविदा काढेल. त्यानंतर ठेकेदार निश्चित केला जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
  • रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केल्यानंतर पूलजोडणीचे काम पालिका करेल.

दिरंगाई का?

प्रकल्पाच्या आराखड्यांमध्ये करण्यात आलेले बदल आणि त्यांच्या मंजुरीसाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे या प्रकल्पासाठीची मुदत याआधी हुकली होती. कोपरी पुलालगत या प्रकल्पाच्या जोडणीसाठी सहा ओव्हरहेड वायरचे खांब हलवावे लागत असल्याने रेल्वेच्या आवश्यक मंजुरींचा तिढाही गेले काही महिने कायम होता.

ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पाच्या कामाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून काम वेगाने पूर्ण करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. – संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane station station area traffic improvement scheme satis soon at passenger service ssb