ठाणे – ” पक्षी दिशा दिशांना, फिरतील ते थव्यांनी, सुकतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, त्यांच्या जिवाकरिता इतकीच करा सेवा, वाटीत एवढेसे, पाणी भरुन ठेवा ” या पंक्तीला साजेसा असा उपक्रम अंबरनाथ तालुक्यातील देवळोली जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राबविला आहे. शाळेच्या प्रांगणात पक्ष्यांसाठी धान्याचे दाणे आणि पाण्याची सोय केली आहे. शाळेच्या शिक्षिका तृप्ती पेन्सलवार यांनी पक्ष्यांची खानावळ या नावाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला असून सर्वांसाठी हा उपक्रम निश्चितच पथदर्शी आहे.
यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाळ्याचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना ही दिल्या जात आहे. तर नागरिकही कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करताना दिसून येत आहे. मात्र या उन्हाची तीव्र झळ ही पक्ष्यांना देखील तितकीच बसत आहे. अशा वेळी पाणी आणि अन्न शोधण्यासाठी पशू कायम शोधात असतात. तर अनेकदा कडक उन्हामुळे आणि पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होतानाच दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यातील कान्होर केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या देवळोली जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची खानावळ असा अभिनव उपक्रम राबवित आहे. यामुळे पक्ष्यांना पाणी आणि अन्न या ठिकाणी उपलब्ध होत आहे.
उपक्रम काय ?
देवळोली जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत वर्ग असून येथील पटसंख्या अवघी २४ इतकी आहे. तर या सर्व वर्गांसाठी तृप्ती पेन्सलवार या एकमेव शिक्षिका आहेत. मात्र त्यांनी याचा विचार न करता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील शिक्षणाबरोबरच इतर अनेक सामाजिक उपक्रमाचे देखील शिक्षण देत आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रांगणात ओली माती टाकून एक मोठे वर्तुळ तयार करण्यात आले आहे. या वर्तुळात सकाळी सर्व विद्यार्थी धान्याचे दाणे टाकतात. तर काही विद्यार्थी लहान भांड्यामध्ये पाणी भरून ठेवतात. यामुळे चिमणी, कावळे, कबुतर यांसारख्या अनेक पक्ष्यांना पाणी आणि अन्न मिळत आहे. गेल्या तीन आठवड्यापासून शालेय विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम अगदी न चुकता राबविला जात आहे. तर सुट्टीच्या दिवशी देखील काही विद्यार्थी या ठिकाणी येऊन पाणी आणि दाणे आवर्जून टाकून जातात.
नुकत्याच पार पडलेल्या होळी आणि धुळीवंदन सणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक होळी साजरी केली. मुख्याध्यापिका तृप्ती अमोल पेन्सलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी गुलमोहराची फुले , बीट, गाजर, झाडाची पाने, फळे आणि हळद,पालक यांच्यापासून नैसर्गिक रंग तयार केले. तर विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार तसेच दुर्गुण नाहीसे करण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील वाईट विचार तसेच दुर्गुण कागदावर लिहून होळी पेटवण्यात आली. तर गत वर्षी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः प्रश्न विचारून मुलाखत घेतली त्यासोबतच विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक साधनांची ओळख सुद्धा करून देण्यात आली. तर स्वतः भात लावणी देखील केली.
विद्यार्थ्यांमध्ये पशू – पक्ष्यांविषयी दया निर्माण व्हावी आणि सामाजिक उपक्रमांचे त्यांना महत्व कळावे या हेतून पक्ष्यांची खानावळ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहे. – तृप्ती पेन्सलवार, मुख्याध्यापिका, देवळोली जि. प.शाळा