ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप सैनिक झाल्यामुळेच त्यांनी भाजपच्या इशाऱ्यावर मुंबई महापालिकेची चौकशी लावली आहे, असा आरोप ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केला आहे. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी नागपूर आणि ठाणे महापालिकेची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी लावावी असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या कारभाराची विशेष तपास पथकामार्फत चौकशी लावली आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या पालिकेच्या कारभाराची चौकशी लावून राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. तसेच चौकशीच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून या वादात मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही उडी घेतली आहे. ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकांवर शिवसेनेची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व करणारे विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिकांचा कारभार सुरू आहे. तसेच नागपुर महापालिकेचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या दोन्ही पालिकेच्या कारभाराची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करत ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिले आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात विज्ञान केंद्र स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपक्रम केंद्र

मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला मुंबईत मानसन्मान मिळवून दिला. मुंबईच्या विकासाची अनेक कामे केली. मुंबई महापालिका फायद्यात आणून देत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या हिताचे काम केले. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यात शिवसेनेचा वाटा महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिल्याने मुंबईची प्रगती झाली. मुंबईची शैक्षणिक सुविधा,आरोग्य सुविधा, रस्ते विकास, अनेक उपक्रम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. असे असताना केवळ भाजपच्या इशाऱ्यावर भाजपचे सैनिक असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या काळापासून ताब्यात असणाऱ्या मुंबई महापालिकेची राजकारणासाठी चौकशी लावली आहे, असा आरोप घाडीगावकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे शिवसैनिक असते तर त्यांनी गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या मुंबई महापालिकेची चौकशी लावली असती का असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री हे भाजप सैनिक झाल्यानेच भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी मुंबई महापालिकेची चौकशी लावली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.