ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागातील वालावलकर मैदानात येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे महापालिकेमार्फत सुरू आहे. याठिकाणी ४० हजारांच्या आसपास नागरिक बसू शकतील, असा भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. याशिवाय, मैदानापासून काही अंतरावरच १२ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी येथे मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत. सशक्तीकरण अभियान कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील अंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, नैना पायाभुत सुविधा प्रकल्प यांचे भूमिपूजन केले जाणार आहे.

येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, त्याआधी म्हणजेच ५ ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर भागात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कासारवडवली येथील बोरीवडे भागातील वालावलकर मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची ठाणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेमार्फत जय्यत तयारी सुरू आहे. याठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतीच एक बैठक घेऊन काही सूचना केल्या. त्यामध्ये हवामान खात्याने वर्तविलेली पावसाची शक्यता लक्षात घेवून मुख्य सभामंडप, वाहनतळ व्यवस्था, वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार याठिकाणी ४० हजारांच्या आसपास नागरिक बसू शकतील, असा भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. याठिकाणी एकूण तीन मंडप उभारण्यात आले आहेत. दोन मंडपांच्या ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा – ठाणे : गतीमंद मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; तर, बहिणीच्या नवऱ्याकडून मारहाण

या कार्यक्रमास सुमारे ४० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून ठाणे तसेच ग्रामीण आणि महापालिकांमधून सुमारे १२०० बसगाड्यांची वाहतूक घोडबंदर भागात होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एक किमीच्या परिघात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोकळ्या जागा, मैदाने याठिकाणी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. येथे बसगाड्यांसाठी ७ तर कार आणि दुचाकीसाठी ५ वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था कमी पडल्यास आनंदनगर येथील बस आगार, खासगी शाळा आणि मैदानातही वाहने उभी करण्याची व्यवस्था निर्माण करून ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी येथे मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत डीएनसी शाळा भागात नवरात्रोत्सव मंडळांकडून डेरेदार झाडांवर विद्युत रोषणाई

वाहतूक बदल

घोडबंदर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू करण्याबरोबरच मनाई आदेश जारी केला आहे. या कार्यक्रमादरम्यान ठाणे ते घोडबंदर वाहिनीवरील सेवा रस्ता, डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनीवरील सेवा रस्ता, ओवळा ते वाघबीळ नाकापर्यंत वाहने पार्क करण्यास मनाई आणि एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. टायटन हॉस्पिटलकडून डीमार्टकडे सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टायटन हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने टायटन हॉस्पिटलकडून डीमार्टकडे जाण्यासाठी ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्याने कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ ब्रिजखालून इच्छित स्थळी जातील. वाघबीळ नाकाकडून ओवळाकडे सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाघबीळ नाका, सिग्नल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वाघबीळ नाकाकडून आनंदनगर व कासारवडवलीकडे जाण्यासाठी टीजेएसबी बँक चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कमार्गे इच्छित स्थळी जातील. किंवा ही वाहने वाघबीळ नाकाकडून ओवळाकडे जाण्यासाठी वाघबीळ ब्रिजखालून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील. टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सेवा रस्ता, वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका, येथे वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही वाहतूक अधिसूचना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून सुरु होवून कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कळविले आहे.