यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी गेल्या आठवडय़ात मात्र पावसाने जिल्ह्य़ात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असताना अपघात होऊ नये म्हणून चालक वाहने सावकाश चालवितात. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीसदृश परिस्थिती निर्माण होते. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे असतील तर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची भीती असते. नेमके हेच चित्र गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील ठिकठिकाणी दिसून आल्याने पावसाळापूर्व कामात रस्त्यावरील खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या संबंधित यंत्रणेचे पितळ उघड पडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या सर्वच शहरांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मात्र या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण मात्र होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही महापालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून एक विशेष मोहीम हाती घेतली असून त्यात शहरातील काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र शहरातील मुख्य मार्गावर खड्डे पडल्यामुळे त्याचा ताण शहरांतर्गत सर्वच वाहतुकीवर येऊन कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्याचा प्रत्यय गेल्या आठवडय़ात आला. ठाणे आणि नवी मुंबई या शहरातील वाहतुकीसाठी कळवा-विटावा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर टोलनाका नसल्यामुळे अनेकजण या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा आकडा मोठा आहे. तसेच घोडबंदर आणि भिवंडीच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूकही या मार्गावरून ठरावीक वेळेत सुरू असते. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाचे काम सुरू केल्याने हा मार्ग आता काहीसा अरुंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावर कोंडी होऊ लागली असून त्यात आता खड्डय़ांची भर पडू लागली आहे. कळवा-विटावा या रस्त्यावरील खड्डे आणि मुसळधार पावसामुळे गेल्या आठवडय़ात या भागात वाहनांच्या लांब रांगा लागल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली. त्यापाठोपाठ कल्याण-शीळ मार्गावरील लोढा जंक्शनजवळ खड्डे पडल्यामुळे या भागात वाहतूक ठप्प होत असल्याचेही चित्र गेल्याच आठवडय़ात समोर आले. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या अक्षरश: नाकीनऊ येत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे कोंडी
पावसाच्या काळात विविध मार्गावरील उंच-सखल भागात पाणी साचते आणि त्यामुळे त्या भागातील वाहतुकीचा वेग अतिशय कमी होतो. परिणामी, वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होते. शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्य़ातील वालीव भागातील डोंगराचे पाणी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आले आणि त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली. या वाहनांच्या रांगा घोडबंदर मार्गावरील गायमुखपर्यंत पोहचल्या होत्या. या कोंडीत चालकासह प्रवासी सुमारे अडीच ते तीन तास अडकून पडले होते. त्यामुळे पावसाळ्यात सर्वच शहरातील संबंधित यंत्रणांनी अशा भागांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून पाणी साचून कोंडी होणार नाही.
वाहतूक कोंडीमुळे हाल
पावसाळ्यात फक्त रेल्वे सेवाच विस्कळीत होते असे नाही, तर रस्त्यावरील प्रवासातही अडथळे निर्माण होतात. गेल्या शनिवारी संध्याकाळी अशाच प्रकारचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. घोडबंदर रोडवर संध्याकाळी सहापासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. त्यात अनेकांचे हाल झाले. रात्री अकरानंतरही ही वाहतूक कोंडी सुटू शकली नव्हती. रस्त्यावरील वाहतूक निर्धोक व्हावी यासाठी वाहतूक विभागाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. किमान चौक आणि महत्त्वाच्या नाक्यांवर वाहतूक पोलीस असणे आवश्यक आहे.
खड्डय़ांमुळे कोंडी आणि अपघात
रस्त्यावरील खड्डे चुकविताना अनेकदा चालकांचा वाहनांवरील ताबा सुटतो आणि वाहन उलटे होऊन अपघात होतात. तसेच काही वेळेस रस्त्यावरील खड्डे चुकविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक बसते. त्यात अनेकदा दुचाकी चालकास आपले प्राणही गमावावे लागतात. यापूर्वी घडलेल्या अपघातांमधून हे दिसून आले आहे. तसेच खड्डय़ामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडीही होते. या पाश्र्वभूमीवर वाहनचालक आणि प्रवाशांच्या अपघातमुक्त व कोंडीमुक्त प्रवासासाठी शहरातील संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करणे गरजेचे आहे.
पावसाळापूर्व काळात काय केले?
पावसाळ्यात कोणतीही आपतकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी शहरामध्ये मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात. त्यामध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचीही कामे करण्यात येतात. तसेच अशा कामांसाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाला आदेशही देण्यात येतात. त्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामेही करण्यात येतात. परंतु जिल्ह्यातील मुख्य मार्गावर ही कामेच झालेली नसल्याचा आरोप वाहनचालकांकडून होऊ लागला असून त्यामुळे मान्सूनपूर्व काळात संबंधित यंत्रणांनी नेमके केले काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
खड्डय़ांचा बंदोबस्त हवा
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे संबंधित यंत्रणेकडून बुजविण्यात येतात. त्यासाठी बारीक खडी, दगड आणि डांबराचा वापर करण्यात येतो. हे खड्डे बुजविल्यानंतर काही दिवसांत पुन्हा उखडतात. असा आजवर वाहनचालकांचा अनुभव आहे. असे खड्डे जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाचा दर्जा चांगला राहील, याकडेही संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.