ठाणे : भिवंडी येथील कारिवली भागात घरामधील छताचे प्लास्टर अंगावर पडून किसन पटेल (१७) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.कारिवली येथील ७२ गाळा परिसरात चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत किसन हा त्याच्या आई-वडिल, भाऊ आणि बहिणीसोबत भाड्याने वास्तव्यास होता.
हेही वाचा…धर्मांतराविरूद्ध उल्हासनगरात मोर्चा, मराठी मुलीच्या धर्मातर प्रकरणानंतर संघटना एकटवल्या
ही इमारत अतिशय जीर्ण झाली होती. त्यामुळे येथील रहिवासी ही इमारत दुरुस्त करण्यासाठी मालकाला विनंती करत होते. शुक्रवारी रात्री किसन पटेल हा घरामध्ये झोपला होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.