ठाणे : ठाण्यातला बाळकुम ते गायमुख असा किनारा मार्ग, छेडानगर ते ठाणे उन्नत मार्ग विस्तारीकरण, कासारवडवली ते खारबाव आणि गायमुख ते पायेगाव खाडी पूल, जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते काटई नाका उन्नत मार्ग तसेच विठ्ठलवाडी ते कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या उन्नत मार्गांच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा जाहीर केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील हे महत्वांकाक्षी प्रकल्प असून यामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान होणार आहे. सुमारे सात हजार कोंटीचे हे प्रकल्प आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून वाहतूक गतीमान करणारे अनेक प्रकल्प सुरू आहेत. तीन वर्षांपूर्वी सर्वकष परिवहन अभ्यासात ठाणे शहर आणि आसपासच्या भागातील प्रवास वेगवान करण्यासाठी काही प्रकल्प उभारण्याची तरतूद केली होती. त्यात पूर्वमुक्त मार्गावरील घाटकोपर येथील छेडानगर ते ठाण्याच्या कोपरीपर्यंत उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव होता. या मार्गात सात जंक्शन आणि ६ उड्डाणपूल येतात. हा मार्ग एकूण १३ किलोमीटरचा असून सहा पदरी उन्नत मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे. यासाठी सुमारे २ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा जाहीर केली आहे. संकल्पन आणि बांधकामासाठी ही निविदा आहे. या प्रकल्पासह अन्य सहा प्रकल्पांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. यात बाळकुम ते गायमुख राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ घोडबंदरर रस्ता अर्थात ठाणे किनारी मार्गाचाही समावेश आहे. या कामासाठी अंदाजे २ हजार १७० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन प्रकल्पांमुळे शहरातंर्गत वाहतुकीला वेग मिळणार आहे.

हेही वाचा…मुंबई नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्याचा भाग भूस्खलनामुळे खचला

कल्याण लोकसभेतील दोन प्रकल्पांचा समावेश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांच्याही निविदा एमएमआरडीएने जाहीर केल्या आहेत. यात कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पाल्मस वॉटर रिसॉर्ट ते बदलापूर रस्ता ते विठ्ठलवाडी येथील जुन्या पुणे लिंक रस्त्यापर्यंतच्या उन्नत मार्गाचा समावेश आहे. एकूण ६४२ कोटींच्या या मार्गाच्या उभारणीमुळे वालधुनी आणि कल्याण कर्जत तसेच कल्याण कसारा रेल्वे मार्गामुळे थेट मार्ग नसलेला भाग जोडला जाणार आहे. यासोबतच जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाकापर्यंतच्या उन्नत मार्गाचीही निविदा जाहीर करण्यात आली असून ६.३ किलोमीटरचा हा मार्ग आहे. यासाठी अंदाजे ९०७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सध्या वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.

हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांनो, मुख्यमंत्र्यांचे बुलडोझर बाबा पोस्टर लावू नका; राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा पोस्टर लावणाऱ्या नेत्यांना टोला

दोन खाडीपुलांच्याही निविदा

ठाण्याच्या कासारवडवलीपासून भिवंडीच्या खारबाव पर्यंत आणि गायमुख ते पायेगावपर्यंतच्या दोन खाडीपुलाच्या कामांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांचा खर्च अंदाजे १ हजार ६०० कोटी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane tenders announced for multiple elevated road and creek bridge projects to improve traffic flow psg