ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलीस रस्त्यावर अहोरात्र काम करत असतात. परंतु याच वाहतुकीचे नियमन करताना आता काही बेदरकार आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचाच जीव धोक्यात आला आहे. सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे बेदरकार वाहनांमुळे पोलिसांचाही जीव धोक्यात असल्याचे समोर येत आहे.
गेल्याकाही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात गृहप्रकल्प उभे राहात असून घोडबंदर, शिळफाटा भागात नागरिकरण वाढले आहे. तसेच, उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुक देखील घोडबंदर मार्गावरून वाहतुक करत असते. हलक्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अनेकदा रस्त्यावर एखादे वाहन बंद पडल्यास वाहतुक कोंडी होत असते. या कालावधीत काही बेशिस्त वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. अवजड वाहनांना तसेच घोडबंदरमधील रहिवाशांना ठाण्यात वाहतुक करण्यासाठी पुरेसे पर्यायी मार्ग नसल्याने कोंडी होत असते. दरम्यान, या वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांची देखील दमछाक उडत असते. मागील २४ दिवसांत वाहतुकीचे नियमन करताना पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे प्रकार समोर आले आहे. अनेकांच्या हाता पायाला गंभीर दुखापत झाली. काही कर्मचाऱ्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
हे कर्मचारी जखमी
- ३ सप्टेंबरला पोलीस हवालदार ललीतकुमार वाकडे हे मुंब्रा येथे कर्तव्यावर असताना शिळफाटा येथील महापे मार्गावर एका मोटारीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.
- ४ सप्टेंबरला पोलीस नाईक अजिम शेख हे घोडबंदर येथील पातलीपाडा भागात नियमन करत असताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत.
- ५ सप्टेंबरला घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात पोलीस हवालदार आकाश जाधव यांना दुचाकीस्वाराने धडक दिली. यात त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
- २१ सप्टेंबरला पोलीस शिपाई सचिन ओमासे हे कल्याण येथील दुर्गाडी भागात कर्तव्यावर असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- २४ सप्टेंबरला शिळफाटा येथील लोढा पलावा भागात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हरवाळकर हे वाहतुक नियमन करून दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी एका अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतुक पोलीस प्राण-पणाला लावून काम करत असतात. नागरिकांनी वाहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लघन करून वाहने चालविल्याने कोंडी आणि अपघात होत आहेत. अशा वाहन चालकांमुळे इतर प्रवाशांचा जीव देखील धोक्यात येतो. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.