दि रेसिडेन्सी, एलबीएस मार्ग, मॉडेला चेकनाका, ठाणे (प)

घराजवळ शाळा, बाजारपेठ, रुग्णालय, वाहतूक सेवा असावी अशी केवळ सर्वसामान्यच नव्हे तर उच्चभ्रू नागरिकांचीही अपेक्षा असते. ठाणे शहरातील काही भागांत निवासी संकुलातील रहिवाशांना घर घेताक्षणीच या सुविधा मिळाल्या. तसेच नंतरही त्यात वाढ होत गेली. एलबीएस मार्गावरील मॉडेल चेकनाका, वागळे इस्टेट येथील दि रेसिडेन्सी हे निवासी संकुल त्यातील एक आहे. ठाणे स्थानक, एलबीएस आणि द्रुतगती मार्ग अशा दळणवळणांच्या सुविधांचाही लाभ येथील रहिवाशांना होत आहे.

देशभरात प्रसिद्ध असलेले ठाणे शहरातील मोठे औद्योगिक केंद्र म्हणून वागळे इस्टेट एमआयडीसीकडे पाहिले जाते. पूर्वी येथे हजारो कारखाने होते. मात्र पाणीटंचाई, आर्थिक मंदी, औद्योगिकीकरणात झालेले बदल आदी कारणांमुळे येथील शेकडो कारखाने बंद पडले. कारखाने विकले गेले आणि त्याजागी माहिती तंत्रज्ञान, कॉलसेंटर आदींची भव्य कार्यालये तर काही ठिकाणी निवासी संकुले उभारली गेली आहेत. दि रेसिडेन्सी हे निवासी संकुलही अशाच एका कारखान्याच्या जागेवर उभे राहिले. कॉसमॉस ग्रुपने १३ वर्षांपूर्वी सुमारे दोन एकर जागेत त्याची उभारणी केली. वास्तूची एक आणि शिल्पची दोन अशा तीन इमारती या संकुलात आहेत. त्यातील वास्तू १४ मजल्यांची तर शिल्प या नावाच्या दोन इमारती प्रत्येकी सात मजल्यांच्या आहेत. तिन्ही इमारतींमध्ये मिळून १०८ सदनिकाधारक आहेत.

पर्यावरणाचे संतुलन

शहर वाढले, विकसित झाले. मात्र नागरीकरणाच्या या नादात मोठय़ा प्रमाणत वृक्षतोड करण्यात आली. परिणामी प्रदूषणाच्या समस्यांनी उचल खाल्ली. मात्र झाडे लावली, ती जगली तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल, याची जाणीव जशी बांधकाम व्यावसायिकाला होती तशी ती येथील रहिवाशांनाही आहे. वसाहत उभारण्यापूर्वी येथे जी विविध प्रकारची झाडे होती, त्यांना कोणतीही इजा न करता नियोजनबद्ध दि रेसिडेन्सी वसाहत उभी करण्यात आली आहे. वृक्षसंवर्धनाबरोबरच रहिवाशांनी स्वच्छतेसही तितकेच प्राधान्य दिले आहे. त्यासाठी वेळोवेळी सदस्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. यासंदर्भात अंमलबजावणीसाठी स्वतंत्र स्वच्छता समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांचा स्वच्छतेबाबत नेहमीच कटाक्ष असतो. इमारतीत लिफ्ट जरी असली तरी प्रत्येक जिनाही स्वच्छ आहे की नाही याची पाहणी सदस्यांकडून अगदी काळजीपूर्वक केली जाते.

पाणी आणि मालमत्ता कर बिले स्वतंत्र

सर्वसाधारणपणे सोसायटी या रहिवाशांकडून महिना दुरुस्तीपोटी घेण्यात येणाऱ्या रकमेत मालमत्ता कर, पाणीबिलही घेत असतात. त्यामुळे काही वेळा या रकमेत चढउतार होताना दिसतो. त्यावरून प्रसंगी वादही होतात. या सोसायटीत मात्र देखभाल खर्चातून बिले भागवली जात नाहीत. ती ज्याची त्याला स्वतंत्र दिली जातात. त्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीची कामेही व्यवस्थित होतात.

कार्यक्रम आणि उपक्रम

पर्यावरणाची जपणूक करताना सांस्कृतिक परंपरेचा वारसाही रहिवाशांनी जोपासला आहे. आनंदमेळा, महिला दिन, हळदीकुंकू, प्रजासत्ताक, स्वतंत्र्य दिन, वर्धापन दिन, गुढीपाडवा आदी सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीतर्फे कार्यक्रमांचे नेटके नियोजन केले जाते. माघी गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. रहिवाशांच्या कुटुंबीयांना त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी या वेळी मिळते. याशिवाय समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, त्यांच्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही तरी करावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून नेत्रचिकित्सा, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. येथील अनेक रहिवाशांनी नेत्रदानाचाही संकल्प सोडला आहे.  वाचन संस्कृती टिकावी यासाठी संकुलात सुसज्ज असे वाचनालयही सुरू करण्यात आले आहेत. त्यात सध्या ७०० पुस्तके उपलब्ध असून वाचनाची आवड निर्माण झाल्याने पुस्तकांची संख्या वाढत आहे. येथील उद्यानात पुस्तक वाचक कट्टा चांगलाच रंगतो, असे सोसायटीचे अध्यक्ष संजय आचार्य यांनी सांगितले.  ज्या समाजातील रहिवाशी येथे राहतात, त्यांचे सण, उत्सव यांमध्ये सर्व जण सहभागी होतात.

आणि १० वर्षांची ‘घरघर’ थांबली

संकुलाच्या बाहेरच एक भव्य मॉल आहे. या मॉलच्या वातानुकूलित यंत्राची कर्णकर्कश ‘घरघर’ आवाजाने संकुलातील शांतता भंग पावत असे. गेली दहा वर्षे हा त्रास रहिवाशी सहन करीत होते. मालकाला अनेक वेळा विनवण्या केल्या. संबंधितांकडे तक्रारी केल्या, परंतु त्याला मालक काही दाद लागू देईना. अखेर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी विकास रेपाळे यांच्या सहकार्याने ही समस्या दूर होण्यास मदत झाली. आता या मॉलमालकाने वेगळे युनिट बसवून ही ‘घरघर’ कायमची शांत केली आहे. त्यामुळे रहिवासी समाधानी आहेत.

सुसज्ज सुविधा

संकुलात एक भव्य क्लब हाऊस आहे. या क्लबहाऊसमध्ये बुद्धिबळ, कॅरम, टेबलटेनिससारखे अंतर्गत खेळ खेळले जातात. रहिवाशांच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्याधुनिक उपकरणासह व्यायामशाळाही आहे. प्रशस्त सभागृह असल्याने वाढदिवस, नामकरण, साखरपुडा यासारखे कार्यक्रम येथे होत असतात. क्लबहाऊसमध्ये खुच्र्या, ध्वनिक्षेपक यंत्रणा आहे, अशी माहिती राजश्री शहा यांनी दिली. रहिवाशांच्या ओळखीच्या बाहेरील व्यक्तींनाही सभागृह भाडे तत्त्वावर दिले जाते. संकुलात उद्यान असून त्यामध्ये लहानमुलांच्या खेळण्याचे साहित्य ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या उद्यानात वाचककट्टा जमतो. कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प येथे राबविला जातो. त्यासाठी प्रत्येक सदनिकाधारकांकडून ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाते. डीम्ड कन्व्हेयन्स झाल्याने मालमत्ता संपूर्ण सोसायटीच्या ताब्यात आहे.

उच्चशिक्षित रहिवासी संकुलासाठी लाभदायक

संकुलात सुमारे ९५ टक्के महाराष्ट्रीय वस्ती आहे. त्यातच सर्व उच्चशिक्षित आहेत. सिव्हिल इंजिनीयर्स, चाटर्ड अकाऊंटंट आदी क्षेत्रातील व्यक्तींची संख्या बऱ्यापैकी आहे. इमारतींच्या दुरुस्तीचे काम अथवा जागेच्या नियोजनाचा विषय असला की सिव्हिल इंजिनीयरची मोठी मदत होते. सी.ए. असल्याने संकुलात आर्थिक घोटाळे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठुसे यांनी सांगितले. भूमिगत सांडपाणी वाहिनी व्यवस्था, मुबलक पाणीपुरवठा, सौर विजेचा वापर, लिफ्ट, नेटबँकिंग आदी सुविधांचा वापर अगदी व्यवस्थितरीत्या होत आहे. काही तांत्रिक दोष आढळल्यास त्या त्या क्षेत्रातील येथे राहणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातात. सरकारी पातळीवरील समस्या असल्यास येथे राहणारे आणि पालिकेच्या शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष विलास ठुसे यांची मदत होते. त्यांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने संकुलातील आवारात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मलनिस्सारण प्रकल्प, कचऱ्याचे व्यवस्थापन आदी कामे पूर्ण झाली आहेत. समितीतील सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे संकुलाचे डीम्ड कन्व्हेयन्सचे कामही झाले आहे. सोसायटी स्थापनेच्या अगदी सुरुवातीसच सौर ऊर्जा प्रकल्प राबविला गेल्याने विजेच्या देयकात सदस्यांना दिलासा मिळाला आहे. मालमत्ता करातही मोठय़ा प्रमाणात सूट मिळाली आहे. भविष्यात नेट बँकिंग, अद्ययावत संगणक प्रणालीसारख्या सेवा तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उपलब्ध करून संस्था तंत्रज्ञानाभिमुख करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे आचार्य यांनी सांगितले.