ठाणे: ठाणे येथील मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर भागातील प्रस्तावित समुह पुनर्विकास योजनेला (क्लस्टर डेव्हलपमेंट) स्थानिकांकडून प्रचंड विरोध होऊ लागला असतानाच, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टरविरोधी भुमिका घेत शनिवारी या भागात जाऊन येथील घरांवर क्लस्टर योजनेसाठी लिहिलेले क्रमांक पांढऱ्या रंगाने पुसून टाकले. यानंतर अनेक रहिवाशांनी आपल्या घरावरील क्रमांक पुसले.
मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर या परिसरात ठाणे महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही ही योजना राबविण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात येथील शाळांवर हातोडा चालविण्यात आला होता.
प्रशासनाकडे विरोध नोंदवूनही क्लस्टरसाठी जबरदस्ती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मानपाडा परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. “आमची घरे वाचविण्यासाठी आम्हाला साह्य करा”, अशी विनंती स्थानिकांनी आव्हाड यांना केली. त्यावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी गोरगरिबांच्या लढ्यात आपण नेहमीच पुढे असतो, असे सांगितले.ठाणे महापालिकेचे काम जनतेला नागरी सुविधा पुरवण्याचे आहे. पण, इथे बिल्डर्सची धनसंपत्ती वाढविण्यातच पालिका अधिकाऱ्यांना अधिक स्वारस्य आहे.

जानेवारी महिन्यात जर शाळा तोडल्या जात असतील तर पैशापुढे माणुसकी हरत असल्याचेच दिसत आहे. तुम्ही मत देताना विचार केला नाही. ज्यांना मत देऊन विजयी केले, तेच आता तुमच्या डोक्यावरचे छतच हटवत आहेत. आपल्याकडे रस्ता नाही, पाणी नाही. यावर आपण प्रश्न विचारत नाही. पण, अधिकाऱ्यांसमोर आपण शरणागती पत्करतोय. आता शरणागती पत्करायची नाही. उन्हा-पावसात मी तुमच्यासाठी लढायला सज्ज आहे. पण, तुम्ही देखील लढायला हवे. जर प्रत्येक घरातून फक्त एक माणूस रस्त्यावर उतरला तर कुणाच्या बापाची हिमंत नाही आपल्याला घराबाहेर काढायची, असे आव्हाड यांनी म्हटले.

क्लस्टर योजनाच बिल्डरधार्जिणी आहे. ती आम्ही उधळून लावणारच आहोत. पण, मानपाड्यात पडलेली ही ठिणगी आता शहरभर पसरणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण तत्काळ बंद करा, असा इशारा देत जनमताचा आदर करणे लोकशाहीत अभिप्रेत असतानाही लोकांचा विरोध असतानाही कशासाठी क्लस्टरचा हट्ट धरत आहात, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.