ठाणे : ठाणेकरांनो तुम्ही बसगाड्यांमधून प्रवास करत असाल तर तुमचा मोबाईल-पैसे सांभाळा, कारण शहरातील बस थांब्यांवर चोरटे तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेऊन असण्याची शक्यता आहे. ठाण्यात गुरूवारी एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूणाचा आयफोन १२ आणि एका महिलेचे दोन मोबाईल चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हांड येथे राहणारी तरूणी गुरूवारी कामानिमित्ताने चितळसर मानपाडा भागात आली होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास घरी परतण्यासाठी ती टीएमटी बसगाडीने प्रवास करीत होती. बसमध्ये गर्दी होती. त्यावेळेस तिच्या पॅंटच्या खिशातील सॅमसंग नोट १० आणि रेड मी नोट ५ मोबाईल चोरटयांनी चोरला.
दुसरी घटना ही गुरूवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास माजीवडा बसथांब्यावर घडली. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा तरूण हा माजिवडा येथून बोरिवली येथे जाण्यासाठी बसगाडीमधून प्रवास करत होता. बसगाडीमध्ये आसन मिळाल्यानंतर त्याने मोबाईल तपासला असता त्याचा आयफोन १२ या हा मोबाईल आढळून आला नाही. त्यानंतर तरूणाने चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणाची तक्रार दिली. या दोन्ही प्रकरणात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही ठाण्यात बसगाडीमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.