डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखापाडा भागातील खंडोबा मंदिरा शेजारील एका गोठ्यातून पंढरपुरी जातीची दुधाळ म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या चोरीप्रकरणी पशुपालकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या म्हशीची किंमत ५५ हजार रूपये आहे.

कुंभारखाणपाडा भागात आशीष दळवी हे पशुपालक राहतात. ते गाई, म्हशी आणि बकऱ्या अशा दुधाळ प्राण्यांचे संगोपन करतात. कुंभारखाणपाडा येथील खंडोबा मंदिरालगच्या कुलस्वामीनी संकुलाच्या बाजुला दळवी यांचा गुरांचा गोठा आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या दूध विक्रीतून ते कुटुंबीयांची उपजीविका करतात. मंगळवारी रात्री दोन वाजता त्यांनी गोठ्यात येऊन गाई, म्हैस आणि शेळ्यांना त्यांची वैरण घातली. त्यांना पाणी पाजले आणि ते पुन्हा आपल्या घरी परतले. गोठ्यामध्ये त्यांची वृध्द आई, दोन मजूर कामगार झोपलेले होते.

घरी आल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात येऊन गोठ्यात असलेल्या वृध्द आई, मजुरांना चाहूल लागून न देता चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यातील दळवी यांची पंढरपूर जातीची दुधाळ म्हैस चोरून नेली. सकाळच्या वेळेत पशुपालक दळवी गोठ्यात शेणगोठा, गाई, म्हशींचे दूध काढण्यासाठी आले. तेव्हा त्यांना गोठ्यात अधिक दूध देणारी पंढरपुरी जातीची म्हैस आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला. पण म्हैस आढळून आली नाही. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली असल्याचा संशय व्यक्त करून पशुपालकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटणे याबरोबर आता डोंबिवलीत पाळीव प्राण्यांच्याही चोऱ्या होऊ लागल्याने आणि त्याचे गुन्हे दाखल करावे लागत असल्याने पोलीसही चिंता व्यक्त करत आहेत.

Story img Loader