ठाणे – श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्यावतीने नववर्ष स्वागत यात्रेअंतर्गत विविध चित्ररथ सहभागी होत असतात. या चित्ररथांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक विषय मांडले जातात. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आले आहेत.
ठाणे शहरातील श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यावतीने हिंदु मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले होते. यंदाचे या संस्थेचे २५वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे या यात्रेत विविध चित्ररथ सादर करण्यात आले होते. या चित्ररथांमध्ये यंदा ‘संस्कृतीचा महाकुंभ-आपले ठाणे आपली स्वागत यात्रा’ या संकल्पनेअंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा विविध विषयांवर आधारित असे ६० हून अधिक चित्ररथ तयार करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आले आहेत.
यावर्षी कर्नाटक सांस्कृतिक मंच आणि दाक्षम जिम्नॅस्टिक यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. यामध्ये दाक्षम जिम्नॅस्टिक यांनी प्रात्यक्षिके सादर केली होती. तर सी के पी समाज चित्ररथास द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे. तृतीय क्रमांक टीजेएसबी सहकारी बँकेच्या चित्ररथास देण्यात आला आहे. यामध्ये टीजेएसबी बँकेच्या वतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, मुळाक्षरे, बाराखडी याचा अर्थशास्त्रासोबत असलेला संबंध उलगडून सांगणारा अनोखा चित्ररथ साकारला होता. तसेच जय मल्हार मंडळ, मावळी मंडळ, तेली समाज आणि ठाणे भारत सहकारी बँक यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे समर्थ भारत व्यासपीठ, एकलव्य क्रीडा मंडळ येऊर आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग या चित्ररथांना उत्तेजनार्थ देण्यात आला आहे. यामध्ये समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाचे महत्त्व लहान मुलाना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. या स्पर्धेचे परिक्षण प्रा. विजय जोशी तसेच विजयराज बोधनकर यांनी केले.