ठाणे : विरुद्ध दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यासाठी ठाणे महापालिका आणि पोलिसांनी गाजावाजा करुन बसविलेले टायर किलर वाहनांचे चाके पंक्चर करण्याऐवजी ते टायर किलरच पंक्चर झाले आहे. मागील काही दिवसांपासून या टायर किलरमधील सुळ्यासारखे यंत्र काम करत नाही. त्यामुळे या टायर किलरचे रुपांतर आता गतिरोधकात झाले आहे. ठाण्यात इतर भागात देखील असे टायर किलर बसविण्याचा प्रयत्न ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांचा होता. परंतु आता पहिलाच प्रयोग फसल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहराला वाहतुक कोंडीने ग्रासले आहे. ठाणे स्थानक परिसरातून हजारो वाहने ठाणे शहरातील विविध भागात वाहनाने जात असतात. रिक्षा आणि इतर व्यवसायिक वाहनांचा भारही या मार्गावर अधिक असतो. शहरात अनेक असे भाग आहेत. ज्या ठिकाणी वाहन चालक विशेषत: रिक्षा चालक आणि दुचाकी चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करतात. शहरातील वाहतुक समस्येविषयी तोडगा काढण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि वाहतुक पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक महापालिकेत झाली होती. या बैठकीत वेगवेगळ्या वाहतुक समस्ये विषयी चर्चा झाली. त्यात विरुद्ध दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना अटकाव करण्यासाठी टायर किलर बसविण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणी हे टायर किलर बसविण्यात येणार होते. त्यानुसार सुमारे महिन्याभरापूर्वी ठाणे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पथ येथे मो.ह. विद्यालयापासून काही मीटर अंतरावर प्रायोगिक तत्त्वावर टायर किलर बसविण्यात आले होते. या टायर किलर विषयी नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया होती. ठाण्यात हा पहिलाच प्रयोग असल्याने वाहन चालक चाकाचे नुकसान होईल या भितीने वाहने हळू चालवित होते. तर काही पादचारी टायर किलरवरुन जाताना जखमी झाले होते.
टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांवर अटकाव झाला होता. परंतु अवघ्या महिन्यरातच टायर किलरमधील खाली-वर होणारे सुळे बंद पडले आहे. त्यामुळे आता या टायर किलरची अवस्था गतिरोधकाप्रमाणे झाली आहे. अवघ्या महिन्याभरातच टायर किलर बंद पडल्याने टायर किलर यंत्राविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
टायर किलरमधील स्प्रिंग खराब झाल्याने कंत्राटदाराला ते टायर किलर पुन्हा बसविण्यास सांगण्यात आल्याचे एका वाहतुक पोलीस अधिकारीने नाव छापू नये या अटीवर सांगितले.
काय आहे टायर किलर
वाहन चालकाने विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास टायर किलरमधील लहान आकारांच्या लोखंडी टोकदार यंत्र वाहनाच्या चाकामध्ये शिरते. हे यंत्र अगदी लहान आकाराच्या सुळ्याप्रमाणे असते. तर, योग्य दिशेने वाहतुक करणारा चालक या टायर सुळ्यांवरून गेल्यास हे सुळे वाहनाच्या वजनाने खाली जातात.