लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या नाक्यांवर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून ही समस्या सोडविण्यासाठी घाटकोपर ते आनंदनगर उन्नत पूर्व मुक्त मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुमीपुजन झालेल्या या प्रकल्पाचे काम चार वर्षात पुर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ठाण्याशी जोडण्याबरोबरच नवी मुंबई, पूर्व उपनगरे आणि त्या पलिकडील भागाशी थेट पोहोचमार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे ठाणे आणि मुंबईचा प्रवास वेगवान होण्याबरोबर इंधन आणि प्रवास वेळेत बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला खेटूनच ठाणे शहर आहे. या शहराचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले आहे. ठाणे शहरातील अनेक नागरिक कामानिमित्त दररोज मुंबईत जातात. या नागरिकांची संख्या मोठी असून ते वाहतूकीसाठी रेल्वे आणि रस्ते मार्गाचा वापर करतात. परंतु वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने आणि त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या दोन्ही शहरांच्या वेशीवर वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने नागरिक हैराण होते. त्यावर उपाय म्हणून राज्य शासनाने घाटकोपर ते आनंदनगर उन्नत पूर्व मुक्त मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला होता. एमएमआरडीएमार्फत प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात करण्यात आले. यामुळे प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून या प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याची मुदत सप्टेंबर २०२८ आहे. त्यामुळे चार वर्षानंतर उन्नत पूर्व मुक्त मार्ग वाहतूकीसाठी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री साताऱ्याचा कशाला? माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे या दोन शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊन नागरिकांचा प्रवास वेगवान होईल. प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी होईल. हा विस्तार मुंबई आणि ठाण्याच्या बाह्य रिंग रोडचा एक भाग असणार आहे. त्यामुळे प्रवासासाठीअंतर्गत रस्ते टाळले जाऊन जलद आणि थेट रस्त्यांचे जाळ उपलब्ध होईल. उन्नत पूर्व मुक्त मार्गामुळे रस्त्यांवरील वाहतूकीचा ताण कमी होईल आणि या विस्तार मार्गाशी महत्त्वाचे मार्ग जोडले जातील. जेणेकरून एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाणे अधिक सुलभ होईल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ठाण्याशी जोडली जाणार आहे. नवी मुंबई, पूर्व उपनगरे आणि त्या पलिकडील भागाशी थेट पोहोचमार्ग उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबईच्या बाह्य रिंग रोडचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होईल. या टप्प्यात नरिमन पॉइंट, वांद्रे-वरळी सागरी सेतू, वर्सोवा आणि दहिसर यांसारखी प्रमुख ठिकाणे जोडली जातील. यामुळे संपूर्ण भागातील प्रवास अधिक सुरळीत होईल. हा विस्तार विद्यमान पूर्व मुक्त मार्गाद्वारे आगामी ऑरेंज गेट बोगद्याशी जोडला जाईल. त्यामुळे एक अखंड आणि कार्यक्षम रिंग रोड प्रणाली तयार होईल. या विस्तारित मार्गामुळे दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट शहरी बोगदा मार्ग ते कोस्टल रोड ते सांताक्रुज चेंबूर लिंक रोड ते पूर्व द्रुतगती मार्ग असा एक रिंग रूट तयार होत आहे. त्यापुढे हा मार्ग जोगेश्वारी विक्रोळी लिंक रोड कडे जोडला तर आणखी एक रिंग रूट तयार होतो. तसेच, ठाण्यात मुलूंड, ऐरोली, मुंब्रामार्गे जाणारा रस्ता इथेही एक भविष्यात रिंग रूट तयार होईल, अशी माहिती एमएमआरडीच्या सुत्रांनी दिली.

आणखी वाचा-प्रदुषणाकारी इंधन वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील बेकऱ्यांना नोटिसा

महत्त्वाचे प्रकल्प तपशील

एकूण लांबीः १३.४० किमी

पूर्णपणे उन्नत कॉरिडॉर

मार्गिकांची संरचना : ३ ३ मार्गिका (एकूण ६ मार्गिका)

रॅम्प्स : ठाणे, ऐरोली जंक्शन आणि कांजुरमार्ग जंक्शन येथे मोक्याच्या ठिकाणी तयार केलेले रॅम्प्स

उन्नत टोल प्लाझा: ५ ५ मार्गिका

प्रकल्प खर्चः ३३१४ कोटी