ठाणे : ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात दिवसेंदिवस नागरिकरणाबरोबरच वाहनांच्या संख्येत होणारी वाढ होत असल्याने शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतूकीचे नियोजन आखून अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिस उपायुक्तांची दमछाक होत आहे. यामुळेच वाहतूक शाखेचे विभाजन करून ठाणे, भिवंडी एक परिमंडळ तर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ असे दुसरे परिमंडळ तयार करण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी तयार केला असून तो राज्य शासनाकडे पाठविलेला आहे. त्यास शासनाकडून हिरवा कंदिल मिळताच, वाहतूक शाखेच्या विभजनासह अतिरिक्त पोलिस बळ उपलब्ध होणार आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासगनर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये ठाणे पोलिसांची पाच परिमंडळे आहेत. त्यामध्ये वागळे इस्टटे, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे. या सर्वच ठिकाणी उपायुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. याशिवाय, या परिमंडळाचे पश्चिम आणि पुर्व प्रादेशिक विभागात विभाजन करण्यात आलेले असून त्यामध्ये ठाणे आणि भिवंडी शहर हे पश्चिम तर, कल्याण ते बदलापूरपर्यंतची शहरे पुर्व पाश्चिम प्रादेशिक विभागात येतात. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाचे दोन अधिकारी नियुक्त आहेत. त्यांच्या अखत्यारीत पोलिस उपायुक्त परिमंडळाचे कामकाज पाहतात. शहरांमधील वाहतूकीचे नियोजन आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी हे कामकाज पाहतो. त्याच्या अखत्यारीत संपूर्ण आयुक्तालय क्षेत्र येते. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्यापासून ते बदलापूरपर्यंतच्या शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्याची जबाबदारी आहे. परंतु ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात दिवसेंदिवस नागरिकरणाबरोबरच वाहनांच्या संख्येत होणारी वाढ होत असल्याने शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतूकीचे नियोजन आखून अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिस उपायुक्तांची दमछाक होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी वाहतूक शाखेचे विभाजन करून ठाणे, भिवंडी एक परिमंडळ तर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ असे दुसरे परिमंडळ तयार करण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी तयार केला असून तो राज्य शासनाकडे पाठविलेला आहे.
हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई
या प्रस्तावामुळे अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी वाहतूक शाखेचे कारभार पाहील आणि त्याच्या अखत्यारीत पुर्व आणि पश्चिम विभागासाठी दोन पोलिस उपायुक्त नेमण्यात येतील. याशिवाय, पोलिसांची कुमकही वाढले. जेणेकरून पोलिस उपायुक्तांना आपल्या भागापुरते नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. हा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठविलेला आहे. त्यास शासनाकडून हिरवा कंदिल मिळताच, वाहतूक शाखेच्या विभजनासह अतिरिक्त पोलिस बळ उपलब्ध होणार आहे.
वाढत्या नागरिकरणामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे एका उपायुक्तामार्फत येथील वाहतूकीचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळेच वाहतूक शाखेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे. या प्रस्तावामुळे एक अतिरिक्त आयुक्त, दोन पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त कर्मचारी वर्ग मिळू शकेल. – आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे
हेही वाचा – अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधून महत्वाचे महामार्ग जातात. या मार्गांवर स्थानिक वाहनांबरोबरच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यामुळे या मार्गावर कोंडी होते. त्यातच अनेक ठिकाणी मेट्रो तसेच रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामामुळे वाहतूक मार्गात बदल करावे लागतात. तसेच या मार्गांवर वाहन बंद पडले किंवा अपघात झाल्यास कोंडी वाढते. काही वेळेस कोंडीमुळे ठाण्याहून कल्याण, अंबरनाथला जाण्यातही अधिकाऱ्यांचा वेळ खर्ची पडतो. यामुळेच वाहतूक विभागाचे नियोजन करून पुर्व आणि पश्चिम प्रादेशिक परिमंडळे तयार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.