ठाणे : रस्ते रुंदीकरणासह उड्डाण पुलांची सुरू असलेली कामे, पावसामुळे डांबरी रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यात शनिवारी सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाढलेला वाहनांचा भार यामुळे वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी झाली होती. या कोंडीमुळे माजिवडा ते आसनगाव असे दोन तासांचे अंतर पार करण्यसाठी सात तासांचा अवधी लागत असल्यामुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले होते. या मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी कशेळी-काल्हेर मार्गावरून अनेक चालकांनी प्रवास सुरु केल्याने या मार्गावरही वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

मुंबई-नाशिक महामार्ग हा वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जातो. उरण येथील जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहने मुंब्रा बाह्य वळण मार्गे खारेगाव येथून मुंबई-नाशिक मार्गावरून वाहतूक करतात. नाशिकहून जेनएनपीटी बंदराकडे जाणारी वाहनेही याच मार्गे वाहतूक करतात. काही वाहने भिवंडी मार्गे वसई येथून गुजरातच्या दिशेने जातात. याशिवाय, भिवंडी शहरात मोठी गोदामे असून याठिकाणी देशातील विविध नामांकित कंपन्यांचे साहित्य ठेवले जाते. येथूनच हे साहित्य शहरांच्या विविध भागात वितरित केले जाते. यामुळे येथे अवजड तसेच हलक्या मालवाहू वाहनांची वाहतूक सतत सुरु असते. दरवर्षी मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडतात आणि त्यामुळे कोंडी होऊन त्यांचा परिणाम ठाणे, मुंब्रा आणि भिवंडी शहरातील अंतर्गत वाहतूकीवर होताना दिसून येतो. यंदाही हेच चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती उन्नत मार्ग, किनारा मार्ग आणि खाडीपुलांसाठी निविदा, सात हजार कोंटींचे प्रकल्प मार्गी

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन पदरी रस्ता आहे. हा रस्ता डांबरी आहे. या रस्त्याशेजारी दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका तयार करण्याची कामे सुरू आहेत. याशिवाय, अनेक ठिकाणी उड्डाण पुल उभारण्यात येत आहे. खाडी पुलावरही पुल उभारणीची कामे सुरू आहेत. हा मार्ग समृद्धी मार्गाला जोडण्यात येणार असून त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. येथे वाहतूकीसाठी उपलब्ध असलेल्या डांबरी रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर रस्ते कामे सुरू असलेल्या ठिकाणी चिखल झाला असून काही ठिकाणी हा चिखल रस्त्यावर आला आहे. यामुळे या मार्गावर कोंडी होत आहे.

हेही वाचा…मुंबई नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्याचा भाग भूस्खलनामुळे खचला

त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण स्वत:ची वाहने घेऊन सहलीसाठी निघाले होते. तर, नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यांना उपस्थिती लावण्यासाठी अनेकजण स्वत:च्या वाहनाने प्रवास करत होते. या वाहनांचा भार वाढल्याने कोंडी वाढली. रस्ते कामामुळे काही ठिकाणी वाहने रोखून धरून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत होती. या कोंडीमुळे माजिवडा ते आसनगाव असे दोन तासांचे अंतर पार करण्यसाठी सात तासांचा अवधी लागल्याचे वाहनचालकांनी सांगितले. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले होते.