ठाणे : मुंबई, पालघर, ठाणे तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्ता दुरुस्तीचे काम शनिवार रात्रीपासून हाती घेण्यात आले असून या कामाच्या पार्श्वभूमीवर कापुरबावडी येथून भिवंडी मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांचा भार वाढल्याने पहाटेच्या सुमारास काही ट्रक चालकांनी घोडबंदर मार्गे वाहने नेण्यास सुरूवात केली. यामुळे या मार्गावर सकाळच्या वेळेत कोंडी झाली होती. दुपारीही या मार्गासह भिवंडी तसेच कॅडबरी ते माजिवाडा मार्गावर कोंडी झाली होती. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले होते.
घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी रात्रीपासून हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील वाहतूक मार्गात मोठे बदल लागू केले असून त्याबाबतची अधिसुचनाही काही दिवसांपुर्वी प्रसारित केली होती. २९ एप्रिलपर्यंत हे काम सुरू राहणार असून तोपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे. शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलाची अंमलबजावणी सूरू केली.
पोलिस कर्मचारी तसेच वाहतूक सेवक माजिवाडा पुल आणि कापुरबावडी चौकातून वाहने भिवंडीच्या दिशेने सोडत होते. मात्र, रात्रीच्या वेेळेत जड तसेच अवजड वाहनांचा भार वाढला आणि यामुळे कापुरबावडी ते आनंदनगर पथकर नाक्याच्या पुढपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले आणि पहाटे ५ वाजेच्या सुमारेस काही ट्रक चालकांनी घोडबंदर मार्गे वाहने नेण्यास सुरूवात केली. गायमुख येथे रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात नोकरदार वर्गाची वाहने रस्त्यावर आल्याने कोंडीत वाढ झाली. घोडबंदरहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गायमुख ते कापुरबावडी, गायमुख ते फाऊंटन हाॅटेल या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत नोकरदार अडकल्याने त्यांचे हाल झाले. अवजड वाहनांना तेथून वळण घेऊन पुन्हा कापुरबावडीच्या दिशेने सोडण्यास सुरूवात झाली. यानंतर सकाळी ९ वाजेनंतर ही कोंडी कमी झाली. असे असले तरी, दुपारच्या वेळेत कासारवडवली ते वाघबीळ पर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. तसेच वाहतूक पोलिस माजिवाडा पुलावर उभे राहून भिवंडीच्या दिशेने वाहने सोडत होते. यामुळे कॅडबरी पुलापर्यंत रांगा होत्या. भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गांवरही वाहनांच्या रांगा होत्या.
गायमुख रस्ते दुरुस्तीसाठी वाहतूक बदल
गायमुख घाट रस्ता दुरुस्ती कामासाठी २६ ते २९ एप्रिल या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. यानुसार, मुंबई, ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापुरबावडी येथून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रस्त्याने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. तसेच कापुरबावडी येथून कशेळी, अंजुरफाटामार्गेही वाहने जातील. मुंब्रा आणि कळव्याकडून घोडबंदर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मानकोली, अंजुरफाटामार्गे जातील. गुजरातकडून घोडबंदर रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना फाऊटन हाॅटेलजवळ प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गुजरात, मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदरच्या दिशेने येणारी वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुरफाटा, माणकोली, भिवंडी मार्गे जातील, अशी माहीती वाहतूक पोलिसांनी दिली.
गायमुख घाट रस्ते कामासाठी वाहतूक बदलांची अधिसुचना काढून ती काही दिवस आधी प्रसारित करण्यात आली होती. वाहतूक बदलांच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिस आणि वाहतूक सेवक नेमले आहेत. परंतु या मार्गांवर रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांचा भार वाढला आणि यामुळे काही वाहने घोडबंदर मार्गे गेल्याने येथे सकाळच्या वेळेत कोंडी झाली. मात्र, वाहतूक पोलिसांनी काही तासानंतर येथील वाहतूक सुरळीत केली.
पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा