कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावर बुधवारी सकाळी मानपाडा, काटई परिसरात एक किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहनांमध्ये नोकरदार, शाळेच्या बस, मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेले पालक अडकून पडले होते. शाळेत, कामावर जाण्याच्या वेळेत ही कोंडी झाल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.

शिळफाटा रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी मेट्रो कंपनीकडून रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम आणि पाया उभारणीची कामे सुरू केली आहेत. या कामाचा त्रास या रस्त्याच्या दोन्ही बाजुने धावणाऱ्या वाहनांना नको म्हणून रस्त्याच्या मधील भागात दोन्ही बाजूने ठेकेदाराकडून संरक्षित पत्रे उभे केले जातात. या पत्र्यांमुळे मेट्रोच्या कामाला वाहतुकीचा अडथळा येत नाही. मंगळवारी रात्री मानपाडा परिसरात मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी पत्रे लावण्यात आले. हे पत्रे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा येत होता. रात्रीच्या वेळेत वाहन संख्या कमी असल्याने या पत्र्यांच्या भागातून वाहन चालकांनी मार्ग काढला.

बुधवारी सकाळी नव्याने पत्रे लावण्यात आलेल्या भागातून वाहनांची संख्या वाढल्याने या भागात वाहतूक कोंडी सुरू झाली. मोठ्या प्रवासी बस, अवजड वाहने या भागातून पुढे नेणे वाहन चालकांना अवघड झाले. त्यामुळे नव्याने पत्रे लावलेल्या भागात कोंडी झाली. एका मार्गिकेवर कोंडी सुरू होताच वाहन चालकांनी विरुध्द मार्गिकेतून वाहने टाकून प्रवास सुरू केला. दोन्ही बाजुच्या मार्गिका मानपाडा, सोनारपाडा भागात वाहतूक कोंडीने जाम झाल्या. पत्र्यांची डोकेदुखी सुरू असताना एक वाहन या रस्त्यावर मध्येच बंद पडले. त्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली.

कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी तातडीने क्रेन बोलावून बंद पडलेले वाहन सहकाऱ्यांच्या मदतीने बाजुला ओढून घेतले. वाहतुकीला अडथळा ठरणारे मेट्रोचे पत्रे संबंधित ठेकेदाराला काढण्यास सांगितले. पत्रे काढल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरूवात केली. तोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. डोंबिवलीतून पलावा, शिळफाटा भागात जाणाऱ्या शाळकरी मुलांना, कामावर निघालेल्या नोकरदारांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसला. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस रस्तो रस्ती झालेली कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते. सकाळी झालेली कोंडी हळूहळू कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

शिळफाटा रस्त्यावर मानपाडा भागात मेट्रोच्या कामासाठी रात्री लावण्यात आलेले पत्रे वाहतुकीला अडथळा येत होते. या पत्रे लावलेल्या भागातून वाहने जाणे अवघड जात होते. त्यामुळे या भागात कोंडी झाली होती. या रस्त्यावर एक वाहनही बंद पडले होते. त्यामुळे काही वेळ या रस्त्यावर कोंडी झाली. पत्रे, बंद पडलेले वाहन बाजुला करण्यात आले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.