मुंब्रा बाह्यव‌ळण मार्गावरून दिवसा अवजड वाहतूकीला मुभा 

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूलावरील मार्गिकेच्या लोखंडी पट्टीतील जोडणीच्या भागामधील बेअरिंग निखळल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल लागू केले असून यामध्ये साकेत खाडी पुलावरून अवजड वाहतूकीला बंदी घालण्यात आली आहे. गुजरात येथून जेएनपीटीच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक माजिवाडा येथून ठाणे, एरोली मार्गे वळविण्यात आल्याने शहरात कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिककडे जाणाऱ्या वाहतूकीसाठी मुंब्रा बाह्यव‌ळण मार्गावरून दिवसा अवजड वाहतूकीला मुभा देण्यात आली आहे.  शुक्रवारपासून वाहतूक पोलिसांनी बदलांची अंमलबजावणी सुरू केली आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कसारा लोकलमध्ये बोगस तिकीट तपासणीसाला अटक; भाजपचा युवा पदाधिकारी असल्याच्या ओळखपत्राचा वापर

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी साकेत पूल महत्त्वाचा आहे. या पुलावर उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात, नाशिकच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या पूलावरील मार्गिकेच्या लोखंडी पट्टीतील जोडणीच्या भागामधील बेअरिंग निखळली आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने हाती घेतले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे वाहतूक पोलिसांना एक पत्र पाठविले असून त्यात या पुलावरून अवजड वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. तसेच दुरुस्ती कामासाठी पुलावरून अवजड वाहतूक बंद करावी, अशी विनंती केली आहे. या पत्रानंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी साकेत खाडी पुलावरून अवजड वाहतूकीला बंदी घातली असून यासंबंधीची अधिसुचना त्यांनी काढली आहे. गुजरात येथून घोडबंदर मार्गे जेएनपीटीकडे तसेच नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात रिक्षा उलटून सहा जण जखमी

जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत माजिवाडा येथून आनंदनगर चेकनाका मार्गे वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत माजिवाडा येथून आनंदनगर चेकनाका, एरोली, रबाळे, कोपरखैराणे, महापे, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, गॅमन, खारेगाव टोलनाका येथून जाण्यास मुभा देण्यात आली आहे. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना आनंदनगर टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत एरोली, रबा‌ळे, कोपरखैराणे, महापे, शीळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, गॅमन, खारेगाव टोलनाका येथून नाशिकच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत. जेएनपीटीकडे जाणारी वाहने ऐरोली, नवी मुंबई मार्गे वळविण्यात येणार आहे. मुंबईतून ठाणे शहर मार्गे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहतूकीला रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत वाहतूकीस मुभा देण्यात आली आहे. जेएनपीटी आणि नवी मुंबई येथून नाशिक, गुजरात आणि भिवंडीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane traffic police decision to banned heavy vehicle from saket creek bridge zws
Show comments