ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. २६ ते २७ मार्च आणि ३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत रात्री ११.५५ पहाटे ४ यावेळेत हे वाहतुक बदल लागू असतील.
ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून वाघबीळ भागात मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारले जाणार आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावर वाहतुक बदल लागू केले आहेत.
हेही वाचा…वाढीव व्याजाच्या आमिषाने डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ४४ लाखाची फसवणूक
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वाघबीळ उड्डाणपुलाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने छेद रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वाहतुक करत उड्डाणपुलावरून जातील. तसेच घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहतुक करतील. २६ ते २७ मार्च आणि ३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत रात्री ११.५५ पहाटे ४ यावेळेत हे वाहतुक बदल लागू असतील.