ठाणे : ठाणे शहरात दुचाकी चार चाकी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्या दरम्यान ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांनी ८ लाख ८२ हजार ७२० वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच एकूण ७३ कोटी २१ लाख ०५ हजार ४५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या समस्यादेखील मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागल्या आहेत. अरुंद रस्ते, बाजारपेठ, रस्त्यांची कामे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ठाण्यातील महामार्गांवर दुचाकी तसेच चार चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने वाहतूक नियमांच्या उल्लंघनात देखिल वाढ झालेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने दैनंदिनरित्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये शिरस्त्राण शिवाय वाहने चालविणे, सिग्नल ओलांडणे, बेकायदेशीर वाहणे उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अति भरधाव वेग, मोबाईलवर बोलत वाहने चालवणे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, अशा विविध वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण ८ लाख ८२ हजार ७२० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
हेही वाचा : महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे
जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये शिरस्त्राण शिवाय गाडी चालविणाऱ्या एकूण १ लाख १७ हजार ६५० जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर सिग्नल ओलांडणाऱ्या ६९ हजार २२३ कारवाई झालेल्या आहेत. तसेच बेकायदेशीर वाहने उभी करणाऱ्या १ लाख ६८ हजार ५८ कारवाई करण्यात आलेल्या आहेत. वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणाऱ्या एकूण १५ हजार ७४१ कारवाई झालेल्या आहेत. दुचाकीवर तिघांचा प्रवास करणाऱ्या २५ हजार २३४ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहेत. रिक्षा मध्ये क्षमतेपेक्षा अधिक तसेच चालकाच्या बाजूला प्रवासी बसवुन गाडी चालवणाऱ्या ८ हजार ७९७ कारवाई झालेल्या आहेत. भर धाव गाडी चालवणाऱ्या ६ हजार ७०८ चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर १८ हजार ७४६ कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतूक शाखा कारवाई करत असूनही वाहनधारक नियमांचे पालन करत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्याचबरोबर जुन महिन्यामध्ये कारवाई केलेली संख्या तसेच दंड वसूल केलेली संख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते आहे.
कारवाई आणि दंड आकडेवारी
महिने | कारवाई | दंड |
जानेवारी | ८७,५८४ | ६,९२,०३,३०० |
फेब्रुवारी | ८१,६८० | ६,२८,९६,७५० |
मार्च | ९९,९७२ | ७,८२,६६,५५० |
एप्रिल | १,००,८०९ | ८,५७,९६,६०० |
मे | १,०८,६०९ | ९,२०,८४,५५० |
जून | १,१३,४०५ | ६,२४,०९,१५० |
जुलै | ७,६२८ | ७६,०९,०५० |
ऑगस्ट | १,०३,६८६ | ९,९०,४२,६०० |
सप्टेंबर | ८१,४४४ | ७,९०,६३,४५० |
ऑक्टोबर | ९७,९०३ | ९,५७,३३,४५० |
वाहनांचे जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळावेत. आम्हाला कोणावरही कारवाई करण्यास आनंद नाही. वाहतुकीमध्ये जो अधिक वेळ जातोय तो बेशिस्त वाहन चालकांमुळे जातो. यामुळे ट्राफिक अधिक होते. तरी सर्व नागरिकांनी लेन शिस्त पाळावी आणि स्व:तला तसेच पोलिसांना मदत करावी. – पंकज शिरसाट ,उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा