ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली काही मुजोर रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवासी हैराण झाले होते. अखेर या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि रात्रीच्या वेळेत स्थानक परिसरात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यास सुरूवात केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरेक्षेच्या दृष्टीकोनातून शेवटचा प्रवासी असे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा मालकांना पांढरा गणवेश आणि चालकांना खाकी गणवेश परिधान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई उपनगरातील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानक परिसरात महापालिकेने सॅटीस पूलाखाली रिक्षा थांबा तयार केला आहे. काही रिक्षा चालक थांबा सोडून बाहेर उभे राहतात आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून दुप्पट रिक्षा भाडे आकारून त्यांची लुट करतात. विशेष म्हणजे, या भागात वाहतूक पोलिसांची चौकी आणि ठाणेनगर पोलिसांचे वाहन उभे असते. पोलिसांदेखत हे सर्व घडत असतानाही ते कारवाई करण्याचे टाळत असल्याचे चित्र होते. या बाबत वाहतूक पोलिसांना तक्रारी प्राप्त होत्या.

हेही वाचा : ठाणे: महिलांसाठी राखीव असलेल्या वेळेतही तेजस्विनी धावते सर्वांसाठी, बस अपुऱ्या पडत असल्यामुळे परिवहन विभागाचा निर्णय

काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्थानक परिसराची पाहाणी केली. त्यानंतर येथील गावदेवी रिक्षा थांबा, स्थानक परिसरातील रिक्षा थांब्याविषयी नव्याने आराखडा तयार केला आहे. गर्दीच्या वेळेत रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूटमार किंवा रिक्षा चालक बेशिस्त पद्धतीने वाहन चालवित असतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सकाळी आणि रात्रीच्या वेळी १०- १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यास सुरूवात केली आहे. वाहतूकीचे नियमन करण्यासाठी हे कर्मचारी उपलब्ध असतील. तसेच रात्रीच्या वेळेत अनेकदा महिला प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सॅटीस पुलाखालील रिक्षा थांब्यावर शेवटचा प्रवासी निघे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रात्री संबंधित अधिकारी त्याठिकाणी उपस्थित आहे. याचे छायाचित्र काढून ते वरिष्ठांना पाठवावे लागणार आहे. या नियमामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळा आहे. गावदेवी परिसरातही रिक्षा चालक दुहेरी पद्धतीने रांग उभी करून वाहतूकीस अडथळा आणत होते. या समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलीस, व्यापारी आणि रिक्षा चालक संघटनेची बैठक पार पडली. रिक्षा चालकांना गर्दीच्या वेळेत आता एकेरी पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नियमांची कडेकोट अंमलबाजवणी झाल्यास सॅटीस पूलाखालील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसू शकतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : बदलापूर ते डोंबिवली परिसरात धो धो, मान्सूमोत्तर पावसाने अनेक भाग जलमय; नागरिकांची तारांबळ

सॅटीस पूलाखालील वाहतूकीचे नियमन करण्यासाठी गर्दीच्या वेळेत सकाळी १० आणि रात्री १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पूलाखाली रिक्षा थांब्यावरील प्रवाशांसाठी एक अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही नियमन केले जाणार आहे. – पंंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक पोलीस.