ठाणे : ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातून वाहत असलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास उल्हास नदी इशारा पातळीजवळ पोहोचली होती. सायंकाळी चारच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १५.९० झाल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली. उल्हास नदीची धोका पातळी १७.५० मीटर इतर आहे. तर इशारा पातळी १६.५० मीटर इतकी आहे.
हेही वाचा <<< भातसा धरणाचे सर्व दरवाजे १.२५ मीटरने उघडले; धरणातून ६५० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु
हेही वाचा <<< कल्याण, डोंबिवलीतील रस्ते पाण्याखाली; टिटवाळा येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली
दुपारपासून नदीची पातळी वेगाने वाढत असल्याने अग्नीशमन दलाने उल्हास नदी किनारी सुरक्षेसाठी दोर बांधून नदी पात्राकडे जाणारे रस्ते बंद केले होते. पाणी पातळी वाढत असताना नदी किनारच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले असून येथील शाळा दुपारीच रिकाम्या करण्यात आल्या असेही भागवत सोनोने यांनी सांगितले. तसेच नदी किनारी असलेले तबेले, गृहसंकुले यांनाही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचेही सोनोने यांनी सांगितले आहे. काळू नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ नोंदवली गेली. दुपारी एक वाजेपर्यंत काळू नदी १०२ मीटरवरून अर्थात इशारा पातळीवरून वाहत होती.