डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावर ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ भूमिगत जलवाहिन्यांना गळती लागली आहे. काही ठिकाणी भूमिगत सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधून पाणी सीमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर वाहून येत आहे. दररोज चोवीस तास हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पादचारी, प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सावरकर रस्ता हा पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे अलीकडे सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर डोंबिवली नागरी सहकारी बँकेसमोरील भागात भूमिगत जलवाहिनीमधून पाण्याची गळती होत आहे. हे पाणी काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहत असते. हे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या मीनी पीलरमधील जीवंत वीज वाहिन्यांमधून वाहत असते. जीवंत वीज वाहिन्या आणि पाण्याचा संपर्क येऊन शाॅर्ट सर्किट होण्याची भीती परिसरातील नागरिकांना वाटते. एक महिना झाला पालिका अधिकारी, महावितरणचे अधिकारी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
पादचाऱ्यांना रस्त्यावरील पाण्यामुळे वळसा घेऊन जावे लागते. दुचाकी स्वार या काँक्रीट रस्त्यावरील पाण्यामुळे दुचाकीसह घसरून पडत आहेत. जीवंत वीज वाहिनीजवळून हे पाणी वाहत आहे. काही दुर्घटना घडण्यापूर्वी पाण्याची ही गळती पालिका अधिकाऱ्यांनी थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.नेहरू रस्त्यावर ठाकुर्ली पुलाच्या पूर्व बाजुकडील पायथ्याजवळ मागील अनेक वर्षापासून भूमिगत जलवाहिनीमधून गळती होत आहे. पालिकेने अनेक वेळा या गळतीवर प्रभावी उपाययोजना केल्या, पण ही गळती थांबत नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी पालिकेने केलेल्या दुरुस्तीमुळे ही गळती थांबली होती. आता पुन्हा ही पाणी गळती सुरू झाली आहे. हा पाण्याचा प्रवाह स. वा. जोशी शाळा, ब्लाॅसम शाळेसमोरील रस्त्यावरून वाहतो. सकाळ, संध्याकाळ पालक याठिकाणी मुलांना शाळेत सोडणे, घरी नेण्यासाठी येतात. त्यांना या रस्त्यावरील पाण्याचा त्रास होतो.
ठाकुर्ली पुलावर पूर्व बाजुने जाणाऱ्या वाहन चालकांना या गळक्या जलवाहिनी भागातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. या सततच्या पाण्यामुळे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या भागातील रस्ता खराब होऊन त्याला खड्डे पडतात. या खड्ड्यातून वाट काढत वाहन चालकांना जावे लागते. दोन महिन्यापूर्वी या भागातील भूमिगत जलवाहिन्यांमधील गळती थांबविण्यात पालिका अभियंत्यांना यश आले होते. परंतु, ही गळती आता पुन्हा सुरू झाली आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी तत्पर हालचाली करून सावरकर रस्ता, नेहरू रस्त्यावरील पाण्याची गळती थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, या दोन्ही ठिकाणच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सावरकर रस्त्यावरील, नेहरू रस्त्यावरील जलवाहिन्या भूमिगत असल्याने रस्ता फोडून मग हे काम करावे लागणार आहे.