आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी ठाण्यातील डॉक्टरांचे पथक पंढरपूरकडे रवाना झाले आहे. कोकण मानवसेवा प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आणि ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात असून पंढरपूर यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी वैद्यकीय शिबिरे आयोजित करून तेथे येणाऱ्या वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा केली जाणार आहे. २३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. जी. पवार यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होतात. ऊन-पावसात चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांचे पथक वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहे. हे पथक १९ जुलै ते २५ जुलै या कालावधीत फलटण ते पंढरपूर या मार्गावर विविध ठिकाणी वैद्यकीय शिबीर आयोजित करणार आहे. या पथकाकडून वैद्यकीय सेवेबरोबरच मोफत औषधांचे वाटपही केले जाणार आहे. डॉ. ओमप्रकाश शुक्ला, डॉ. राजन रेळेकर, डॉ. दुबे, डॉ. सुनील साठे, डॉ. सी. एच. काळे, डॉ. हर्षदा कोल्हे, डॉ. दिनकर गौड, डॉ. सुनील प्रजापती, डॉ. अजय तिवारी, डॉ. विश्वास कोंडणकर, डॉ. राज इसरानी या सर्व नामवंत डॉक्टरांसह औषधांचे वाटप करण्यासाठी व वारकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी अभय मराठे, अशोक घोलप, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल मिश्रा, सुनील म्हात्रे, गिरीश कुलकर्णी आदी कार्यकर्ते या पथकात सहभागी झाले आहेत.