ठाणे आणि विटावा भागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम पूर्णत्वास आले असून, या पुलाच्या उर्वरित कामांचा पाहाणी दौरा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी केले. पुलाची उर्वरित कामे लवकर पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करावा आणि या पुलाला शाहीर दामोदर विटावकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली. या पुलामुळे नवी मुंबई, कळवा आणि विटावा भागातील नागरिकांना अवघ्या पाच मिनिटांत ठाणे स्थानकापर्यंत पायी प्रवास करणे शक्य होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
कळवा आणि विटावा भागातील नागरिकांना खाडी पुलावरून वळसा घालून ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करावा लागतो. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ठाणे-विटावा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. कळवा आणि ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या खाडीवर हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे कळवा-विटावा आणि ठाणे स्थानक हे दोन्ही परिसर एकमेकांना जोडले जाणार असून, या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाच्या कामाची पाहाणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी केली. २००९ मध्ये आमदार झाल्यानंतर येथील नागरिकांनी ठाणे आणि विटावा भागाला जोडणारा पूल उभारणीची मागणी केली होती. त्यानुसार या पुलाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला होता.
हेही वाचा – कल्याणमध्ये केंब्रिया शाळेतील सायन्स कार्निव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाच्या कामाला साहाय्य केले. अधिकारी वर्गानेही पुलाच्या कामासाठी मदत केली. कावेरी सेतूप्रमाणेच ठाणे ते विटावा हा पूल एक क्रांतिकारी प्रकल्प आहे, असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले. या पुलामुळे कळवा आणि विटावा वासियांना अवघ्या पाच मिनिटांत ठाणे स्थानकात पोहचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ऐरोली आणि नवी मुंबईतून ठाणे स्थानकापर्यंतचा प्रवास करणाऱ्यांनाही या पुलाचा फायदा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी काही छोटी कामे शिल्लक आहेत. ही कामे लवकर पूर्ण करून हा पुल नागरिकांसाठी खुला करावा आणि या पुलाला शाहीर दामोदर विटावकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली.
हेही वाचा – कंटेनरच्या धडकेमुळे भिंत अंगावर कोसळून तरूणाचा मृत्यू चार जण जखमी
आमदार आव्हाड यांचे मतदारसंघात ठाण…
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाचे १५ ते १६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून मुंब्य्रापाठोपाठ कळव्यातही पक्षाला खिंडार पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बंडाची तयारी करीत असून या भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे हे या बंडाचे शिलेदार मानले जात आहे. यामुळे आव्हाडांसाठी हा संघर्षाचा काळ मानला जात असून या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी मतदारसंघात ठाण मांडल्याचे चित्र मंगळवारच्या दौऱ्याच्यानिमित्ताने दिसून आले.