ठाणे – वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर सोमवारी सायंकाळी एका ४८ वर्षीय कचरा वेचक महिलेचा जेसीबीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे. जर, ही मागणी पूर्ण केली नाही तर, ठाणे महापालिका मुख्यालया समोर मृत महिलेचा मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा इशारा कुटुंबातील सदस्यांनी दिला आहे.

राजश्री जाधव(४८) असे मृत महिलेचे नाव आहे. वागळे इस्टेट भागात त्या वास्तव्यास होत्या. वागळे इस्टेट भागात असलेल्या ठाणे महापालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रावर त्या कचरा वेचकाचे काम करत होत्या. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्या कचरा वेचत असताना बाजूला काम करत असलेला जेसीबीचा त्यांना धक्का लागला. त्या अपघातात त्यांना गांभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते.

याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु, कुटुंबातील सदस्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी आणि आर्थिक मदत तात्काळ करावी ही मागणी पूर्ण केली नाही तर मृतदेह ठाणे महापालिका मुख्यालया समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी महापालिकेला दिला आहे.