ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रात गाळ आणि कचरा अडकल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात ५० टक्के कपात लागू झाली असतानाच, त्यापाठोपाठ मुख्य पाणी वितरण व्यवस्थेत बुधवारी सकाळी बिघाड झाल्याने शहराचा पाणी पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळपर्यंत हे काम सुरू असल्याने शहरातील पाणी वितरणाचे गणित कोलमडून शहरातील पाणी टंचाईच्या संकटात भर पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदी पात्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात गाळ आणि कचरा येऊन अडकल्याने शहरात ५० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरू असून या कामामुळे ११ जुलैपर्यंत शहरात अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी वितरणाचे गणित कोलमडल्याने ठाणेकरांचे हाल होत आहेत.

हेही वाचा…सासुच्या छळाने त्रस्त पोलीस पत्नीची कल्याणमध्ये आत्महत्या

नागरिक पाण्याचे मोठे बाटले विकत घेत असून या पाणी बाटल्यांची मागणी वाढली आहे. तसेच चाळींच्या भागातही नेहमीपेक्षा कमी वेळच पाणी पुरवठा होत असून येथील नागरिकांचीही पाण्यासाठी वणवण सुरु आहे. चाळी आणि इमारतींमधील नागरिकांकडून टँकर मागविण्यात येत असल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. असे असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीमध्ये टेमघर-माजिवडा दरम्यान बुधवारी सकाळी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे जलवाहीनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. आधीच पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचऱ्यामुळे ५० टक्के पाणी कपात लागू असतानाच, त्यात मुख्य पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडामुळे पाणी टंचाईत भर पडली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane water crisis deepens main distribution system failure compounds ongoing 50 percent supply cut psg