ऋषीकेश मुळे

धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा; पाणीकपातीत वाढ नाही

ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणातील पाणीसाठय़ात १० टक्के तूट असली तरी गेल्या तीन महिन्यांपासून लागू असणारी प्रति आठवडा ३० तासांची पाणीकपातीत कोणतीही वाढ होणार नाही असा दिलासा लघु पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आखून दिल्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत असल्याने पाणी कपातीत वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, १५ जुलैपर्यत पुरेल इतका पाणीसाठी धरणात असल्याने पाणी कपात आणखी वाढविण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण संबंधित विभागातील सूत्रांनी दिले.

स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्था आंध्र आणि बारवी धरणांतून पाण्याचा उपसा करतात. या प्राधिकरणांद्वारे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या भागांना पाणीपुरवठा होतो. सद्यस्थिती आंध्र आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये २०३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे जिल्ह्य़ास पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांना ४० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा होतो. यापैकी प्रतिदिन या प्राधिकरणांना १२४० दशलक्ष मीटर पाण्याचा उपसा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र पाणीपुरवठा करणारी चारही प्राधिकरणे दररोज १५४० इतका पाण्याचा उपसा करतात. मूळ मर्यादेपेक्षा अधिकचा ३०० दशलक्ष मीटर पाणी उपसा प्राधिकरणे करत असली तरी त्यांची पाण्याची गरज ओळखून सामंजस्याची भूमिका लघुपाटबंधारे विभाग बजावत आहेत. सद्यस्थितीत ठाणे शहरातील पाणीपुरवठा दर बुधवारी बंद ठेवण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांनी अधिक पाणीटंचाई होण्याची शक्यता वर्तवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाण्याचा अधिकचा उपसा होत असल्याने कपातीत वाढ होईल, असा इशाराही मध्यंतरी पाटबंधारे विभागाने दिला होता. प्रत्यक्षात पुढील १५ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी धरणात असल्याने कपातीत आणखी वाढ केली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तापमान वाढत असले तरी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. धरणांमधील पाण्याचा उपसा नियंत्रित असावा यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

-उमेशचंद्र पवार, कार्यकारी अभियंता-लघुपाटबंधारे विभाग, ठाणे.

Story img Loader