ठाणे : ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र तयार करून पाकिस्तान गाठल्याचे समोर आले होते. महिलेने पाकिस्तानात जाऊन तेथील एका तरुणासोबत निकाह केला. त्यानंतर ती भारतात परतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तिच्याविरोधात बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तिची चौकशी सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकमान्य नगर येथील पाडा क्रमांक चार परिसरात २३ वर्षीय तरुणी वास्तव्यास होती. ती विवाहीत असून तिला दोन मुले आहेत. पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी तिने पारपत्र आणि व्हिसा तयार केला होता. त्याआधारे तीने पाकिस्तान गाठले होते. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा भारतात परतली होती. केंद्रीय तपास यंत्रणांना संशय आल्यानंतर त्यांनी या महिलेची माहिती मागविली. तिच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. महिलेने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच तिच्या मुलीच्या नावाने बनावट जन्मदाखला आणि आधारकार्ड तयार केले. हे कागदपत्र तिने पारपत्र अर्जासोबत जोडून ते पारपत्र कार्यालय आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात सादर केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तिला पारपत्र मिळाले. त्यानंतर तिने पाकिस्तानचा व्हिसा प्राप्त केला आणि ती पाकिस्तानमध्ये गेली होती असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणात तिची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे.

हेही वाचा : मुसळधार पावसामुळे टिटवाळाजवळील रूंंदे पूल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला

दरम्यान, कागदपत्र बनावट नसल्याचा दावा महिलेने केला आहे. मी आधारकार्डवरील केवळ नाव बदलले होते. माझा पहिला निकाह झाला होता. परंतु पती मारहाण करत असल्याने ठाण्यात माहेरी आले होते. पती न्यायला येत असल्याने नावामध्ये बदल केला. २०२१ मध्ये समाजमाध्यमाद्वारे माझी ओळख पाकिस्तानमधील तरुणासोबत झाली होती. त्यानंतर आम्ही निकाह करण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ मध्ये पारपत्र बनविले. फेब्रुवारी २०२४ मध्ये आम्ही ऑनलाईन निकाह केला. पाकिस्तानमध्ये माझ्या पतीने निकाहाची नोंद केली. मे महिन्यात मी पाकिस्तानात गेले. माझे पती रावलपिंडी येथील एका हाॅटेलमध्ये काम करतात. तिथे पोहचल्यानंतर आम्ही सोहळा साजरा केला. तीन महिने तिथे राहिल्यानंतर मी भारतात परतले असे महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का; आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश

बनावट कागदपत्र प्रकरणात महिलेविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.

अमरसिंह जाधव, उपायुक्त.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane woman married to pakistani guy gets her indian passport with fake aadhaar card and pan card css