ठाणे : रमजान सणानिमित्ताने आई-वडिलांना भेटायला गेला म्हणून महिलेने पतीला भांडी फेकून मारली. तसेच चाकूने वार केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जखमी ३२ व्यक्ती, त्याची ३५ वर्षीय पत्नी, दोन मुले आणि १८ वर्षीय सावत्र मुलासोबत राहतो. त्याच्या पत्नीचा हा दुसरा निकाह आहे. २०२१ मध्ये निकाह झाल्यानंतर तिने पतीवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. त्याला आई-वडिलांना भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागत होते. तसेच त्याला घरामध्ये वेळेवर जेवण देखील मिळत नव्हते.
रमजान निमित्ताने आई-वडिलांना भेटण्यास गेला अन्
२८ मार्चला तो त्याच्या लहान मुलाला घेऊन रोजा सोडण्यासाठी आई-वडिलांकडे गेला होता. तो पुन्हा घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीने या कारणावरून त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. ३१ मार्चला रमजान् ईद निमित्ताने तो आई-वडिलांना पुन्हा भेटण्यासाठी गेला. याबाबतची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली. तिचा संताप अनावर झाला. रात्री ११.३० वाजता तो घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीने वाद घालण्यास सुरुवात केली.
भांडी फेकून मारण्यास सुरुवात आणि चाकूने वार
आई-वडिलांना भेटला म्हणून पत्नीने आणि १८ वर्षीय सावत्र मुलाने त्याच्या दिशेने स्वयंपाकगृहातील भांडी फेकून मारण्यास सुुरुवात केली. त्यामुळे तिघांमध्ये झटापटी झाली. यात त्याच्या पत्नीने स्वंयपाकगृहातील चाकू घेतला आणि त्याच्या हातावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला. त्याने तात्काळ घटनेची माहिती नातेवाईकांना मोबाईलद्वारे संपर्क साधून दिली. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलीस ठाण्यात पत्नी आणि सावत्र मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.