ठाणे : विविध गुन्ह्यांना पायबंद बसावा यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरातील ९१७ बसविण्यात येणाऱ्या ३ हजारहून अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांकरीता आवश्यक असलेले खांब उभारणीस ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. असे असले तरी, कॅमेऱ्यांच्या वाहीनीसाठी नवेकोऱ्या रस्त्यांची खोदाई करावी लागणार असल्यामुळे पालिका प्रशासनाने या कामाला मात्र अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. यामुळे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांकरीता खांब उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले वाहीन्यांचे काम अद्याप सूरू होऊ शकलेले नसल्याचे चित्र आहे.
संपुर्ण आयुक्तालयातील १ हजार ९९७ ठिकाणी ६ हजार ५१ इतके सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता देत प्रकल्पासाठी ५७० कोटी ३० लाखांचा निधी मंजुर केला आहे.
यानुसार ठाणे ते दिवा शहरात ३ हजार १६३, भिवंडी शहरात १,३४७ आणि उल्हासनगर ते बदलापूर १,५४१ असे एकूण ६ हजार ५१ सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यातील ठाणे शहरातील कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी शहरातील ३०० किमीचे रस्ते खोदण्यास परवानगी देण्याबाबत ठाणे पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मागणी केली. परंतु ठाणे शहरात कोट्यावधी रुपये खर्चून अनेक रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत. नवेकोरे रस्ते खोदल्यास त्या रस्त्यांची दुरावस्था होऊ शकते. त्यामुळे खोदकामाच्या परवानगीस नकार देत पालिका प्रशासनाने विद्युत खांबांवरून उन्नत किंवा पदपथाजवळील भागातून कॅमेऱ्यांच्या वाहिन्या टाकण्याचा पर्याय दिला होता. पालिकेच्या भुमिकेमुळे पेचात सापडलेल्या ठाणे पोलिसांनी त्यावर विचार सुरू केला होता. असे असतानाच, ठाणे पोलिसांनी सीसी टिव्ही कॅमेऱ्यांकरीता आवश्यक असलेले खांब उभारणीसाठी पालिकेकडे परवानगी मागितली होती. त्यास पालिकेने परवानगी देताच, ठाणे पोलिसांनी कॅमेऱ्यांकरिता आवश्यक असलेले खांब उभारणीचे काम सुरू केले आहे. असे असले तरी कॅमेऱ्यांच्या वाहीनीसाठी नवेकोऱ्या रस्त्यांची खोदाई करावी लागणार असल्यामुळे पालिका प्रशासनाने या कामाला मात्र अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. यामुळे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांकरीता खांब उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले वाहीन्यांचे काम अद्याप सूरू होऊ शकलेले नसल्याचे चित्र आहे.
ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथके, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्ती घालत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे निरनिराळ्या गुन्ह्यांना पायबंद बसावा तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेता यावा, यासाठी ठाणे पोलिसांकडून संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात ६ हजार ५१ इतके सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
सीसीटिव्ही कॅमेऱ्यांकरीता आवश्यक असलेले खांब उभारणीस ठाणे महापालिकेने परवानगी दिल्याने त्या कामास सुरुवात झाली आहे. तर, कॅमेऱ्यांच्या वाहीनीसाठी रस्त्यांची खोदाईस पालिका प्रशासनाने परवानगी दिलेली नसून ही परवानगीही लवकरच मिळेल, अशी माहिती ठाणे पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप कन्नालू यांनी दिली.