येथील वर्तकनगर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक कामगार इमारतीच्या लिफ्टच्या डकमधून खाली पडला. लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला आहे.
आशिष चव्हाण ( २२) असे मृत झालेल्या कामगारांचे नाव असून तो उत्तरप्रदेशमधील मोहमदाबादचा रहिवाशी आहे.वर्तकनगर भागात एका नामांकित व्यावसायिकाकडून गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी रविवारी रात्री दहा वाजता इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावेळेस तिथे काम करणारा एक कामगार इमारतीच्या डकमधून खाली पडला.
त्यावेळेस खाली असलेल्या लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सळ्यामध्ये अडकलेला त्याचा बाहेर काढण्याचे काम सुरू केले. पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास गॅस कटरने लोखंडी परांचीचा पाईप कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.