ठाणे : सरत्या वर्षाला निरोप तर, नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतात. निसर्गरम्य वातावरण आणि शांततेच्या ठिकाणी आपल्या मित्र मंडळींसह किंवा कुटूंबासह हा दिवस साजरा करण्याकडे अनेकांची पसंती आहे. परंतू, यंदा ३१ डिसेंबर मंगळवारी आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. असे असले तरी, हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणांनी कर्जत, लोणावळा तसेच माथेरान असे जवळचे ठिकाण निश्चित केली असून येथील शेतघरांची त्यांनी आगाऊ नोंदणी केली आहे.

नाताळ आणि नववर्ष या आठवड्याभराच्या कालावधीत ठाणे, मुंबई आणि उपनगरातील हजारो पर्यटक बाहेरगावी फिरायला जातात. तर, ज्यांना बाहेरगावी जाण्यास शक्य होत नाही असे नागरिक दोंंन ते तीन दिवसांसाठी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह कर्जत, लोणावळा, माथेरान याठिकाणी आपल्या कुटुंबासह किंवा मित्रमंडळींसह नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जातात.

हेही वाचा : कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी नाही, एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार

यंदा ३१ डिसेंबरला मंगळवार असल्यामुळे काहींचा हिरमोड झाला असून यादिवशी नववर्षाचे स्वागत कसे करायचे असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. ठाण्यातील जयेश धात्रक याने सांगितले की, मला ३१ तारखेला रजा नाही. परंतू, मला हा दिवस माझ्या मित्रांसोबत साजरा करायचा आहे. यासाठी आम्ही कर्जत येथील एका शेतघरात ३१ डिसेंबरला संध्याकाळपासून ते १ जानेवारी सकाळपर्यंतची नोंदणी केली आहे. कर्जत भागातील शेतघरावर २४ तासासाठी प्रत्येक व्यक्तीमागे तीन हजार रुपये तर, खासगी बंगल्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे ३२०० रुपये आकारण्यात येतात. यामध्ये दोन वेळची न्याहारी, जेवण आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. या शेतघर आणि बंगल्याच्या चौकशीसाठी सर्वाधिक तरुणांचा दुरध्वनी येत असल्याची माहिती गोपाळ जोरी यांनी दिली.

कर्जत आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह माथेराण आणि लोणावळ्यात नववर्ष साजरा करण्याकडे तरुणांचा कल आहे. पर्यटक कंपनीचे रोहन ढवळे यांनी सांगितले की, यंदा जास्त करुन पर्यटकांचा ओढा तलावाच्या बाजूला कॅम्पिंग (लेक साईड कॅम्पिंग) कडे असल्याचे पाहायला मिळत आहे. आजकाल अनेकांना थेट गायन (लाईव्ह सिंगींग) अनुभवण्यास आवडते. हा क्षण तलावाच्या बाजूला कॅम्पिंग करताना मिळतो. त्यामुळे ३१ तारखेचा दिवस निसर्गरम्य वातावरणात संगीतमय व्हावा यासाठी लोणावळ्यातील पवना तलावाच्या ठिकाणी तसेच पुण्यातील पानशेत येथे जाण्यास पसंती देत आहेत.

हेही वाचा : ठाण्यात डास प्रतिबंधाची जबाबदारीही गृहसंकुलांवरच

हिमाचल प्रदेश, शिमला -मनाली, श्रीनगरमध्ये मोठ्या सुट्ट्यांचे नियोजन

डिसेंबर ते जानेवारी हा कालावधी पर्यटनासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे याकाळात पर्यटक कंपन्यांकडूनही आकषर्क असे सवलती दिल्या जातात. यंदा २५ डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हिमाचल प्रदेशात जाण्यासाठी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केल्या आहेत. यामध्ये लाहुर येथील सिसु, मनाली आणि शिमला याठिकाणी जाण्यास पर्यटक पसंती देत आहेत. तर, जम्मू – काश्मिरमधील श्रीनगर आणि गुसमर्ग येथेही जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी नोंदणी केल्या असल्याची माहिती एका पर्यटक कंपनी कडून देण्यात आली.

Story img Loader