ठाणे – शहरातील श्रीकौपिनेश्वर न्यासतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या स्वागत यात्रेचे यंदा २५ वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा यापार्श्वभूमीवर आयोजकांनी युवा दिनाचे औचित्य साधून शहरात युवा दौड आयोजित करण्याचे ठरविले आहे. यासाठी शहरातील विविध संस्थांना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वागत यात्रेचे यंदा २५ वे वर्षे असल्यामुळे चार महिन्या आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे. यंदा संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन पहिल्या बैठकीत आयोजकांनी संस्थांना केले होते. तर, यात्रेत तरुणांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे, अशी माहिती डॉ. आश्विनी बापट यांनी दिली.
हेही वाचा – डोंबिवलीत रामनगरमध्ये एका रात्रीत सहा दुकानांमध्ये चोरी
हेही वाचा – टिटवाळा-शिळफाटा मार्गावरील डोंबिवलीतील वळण रस्ते कामाला प्रारंभ
स्वागत यात्रा संदर्भात सोमवारी दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी युवा दौड आयोजित केली जाणार आहे. १२ जानेवारील युवा दिनानिमित्त युवा दौड काढली जाणार आहे. या युवा दौडमध्ये जास्तीजास्त तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी शहरातील सहभागी संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच शहरातील महाविद्यालयांमध्येही व्याख्याना माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. भारत २०४७ याविषयावर हे व्याख्यान पार पडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यंदा गुढीपाडवा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असला तरी, स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष म्हणून तीन महिन्या आधीपासून कार्यक्रमांची रेलचेल असलेली पाहायला मिळणार आहे. यामध्ये सांस्कृतीक, सामाजिक, सांगितीक आणि प्रबोधनात्मक असे विविध प्रकरचे कार्यक्रम असणार आहेत.
© The Indian Express (P) Ltd