ठाणे : तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल क्रांती होत आहे. मात्र, शासकीय यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे हे मोठे आव्हान असते. याच आव्हानाला सामोरे जात ठाणे जिल्हा परिषद डिजिटल युगात पाऊल टाकताना दिसत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात विविध योजनांसाठी स्मार्ट ॲप्लिकेशन्स विकसित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीसाठी ‘दिशा ॲप’, मानसिक आरोग्य तपासणीसाठी ‘मायका’, तसेच नव्याने सुरू होणारे ‘आदर्श आपले सरकार केंद्र’ यासर्व ॲप्सच्या मदतीने ठाणे जिल्हा परिषद स्मार्ट प्रशासनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक कामे सोपे आणि सहजपद्धतीने होतात. या तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी केला तर, तंत्रज्ञानाची माहिती त्यांना होईल आणि त्यांची याबाबत असलेली भिती दूर होईल, या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या वर्षेभरात विविध ॲप्लिकेशन तसेच संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी दिशा प्रकल्प आंमलात आणला आहे. या प्रकल्पा अंतर्गत एक ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्या ॲप्लिकेशनवर विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. हे ॲप्लिकेशन कृत्रिम बुद्धिमत्त (एआय) चा वापर करुन तयार करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनमुळे जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता स्तर समजण्यास मदत होत असून शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देता येत आहे. तर, मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘मायका’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. कामाच्या वाढत्या तणावामुळे कर्मचारी अनेकदा मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या समस्या वाढत असल्याने, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सहाय्याने चॅटबॉटच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध आहे. मानसिक आरोग्याविषयीच्या शंका दूर करण्यासाठी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी या ॲपचा उपयोग होत आहे.

आदर्श आपले सरकार केंद्र ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम सुरु

ठाणे जिल्हा परिषदेने ‘आदर्श आपले सरकार केंद्र’ असे घरपोच दाखल्यांची सुविधा देणारे ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये ग्रामपंचायत विभागाकडून उपलब्ध होणारे जन्म नोंद, मृत्यू नोंद, विवाह नोंद, दारिद्रीरेषेखालील, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा, नमुना ८ चा उतारा आणि निराधार असल्याचा दाखला असे सात दाखले तसेच महसुल विभागाचे काही दाखले उपलब्ध होणार आहेत. यामध्ये नागरिकांना घरबसल्या पाहिजे त्या दाखल्यासाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज नागरिकांना घरपोच उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद एका कंपनी सोबत करार करणार असून त्या कंपनीचा व्यक्ती नागरिकांना दाखला घरी जाऊन देणार आहे. हे ॲप्लिकेशन येत्या १५ ते २० दिवसांत सुरु होईल अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.

तंत्रज्ञानाचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सोप्या पद्धतीने होऊ लागली आहेत. परंतू, याचा योग्या वापर करणे प्रत्येकाला समजले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या काही योजनांचा लाभ नागरिकांना घरबसल्या मिळावा, तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधरविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा मानसिक आरोग्यासाठी हे ॲप्लिकेश तयार करण्यात आली आहेत. या ॲप्लिकेशन कसे हाताळावे याचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

रोहन घुगे, मुख्यकार्यकारी अधिकारी