डोंबिवली : डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यालगतच्या निळजे गाव हद्दीत ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातील पाच कर्मचारी विना परवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या पाचही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निळजे आरोग्य केंद्रातील आरोग्य साहाय्यक जगन्नाथ धनगर, औषध मिश्रक विनोद पवार, परिचारिका चव्हाण, आरोग्य सेविका निलिमा चव्हाण, कनिष्ठ साहाय्यक हरड यांचा निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामात कर्तव्यतत्पर राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी दिले होते. नागरी सेवेत प्रत्येक कर्मचाऱ्याने तत्पर असण्याचे घुगे यांचे आदेश आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे अंबरनाथ भागात दौऱ्यावर होते. ठाणे येथून निघाल्यावर त्यांनी शिळफाटा रस्त्यालगतच्या निळजे आरोग्य केंद्राला भेट देण्याचा अचानक निर्णय घेतला. या दौऱ्याची कोणत्याही जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती. निळजे गावाजवळ घुगे यांनी आपल्या वाहन चालकाला वाहन जिल्हा परिषद अंतर्गत निळजे आरोग्य केंद्रात घेण्यास सांगितले. हे केंद्र रस्त्याच्या आडबाजुला आहे. याठिकाणी कोणीही अधिकारी शक्यतो फिरकत नसल्याचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.

परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी अचानक निळजे आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेवा, रुग्णसेवेची माहिती घेण्यासाठी या केंद्रात भेट दिली. त्यावेळी तेथे शिपायाच्या व्यतिरिक्त कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. इतर कर्मचारी कोठे आहेत. रुग्ण आल्यानंतर त्याला येथे सेवा कोण देतो असे प्रश्न उपस्थित केल्यावर उपस्थित शिपाई गोंधळून गेला. ग्रामीण भागातील महत्वाचे आरोग्य केंद्र असताना या केंद्रातील पाच कर्मचारी एकाचवेळी गैरहजर असल्याचे दिसल्यावर घुगे संतप्त झाले. विना परवानगी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यावर घुगे यांनी पाचही आरोग्य कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. या कर्मचाऱ्यांची आता विभागीय चौकशी केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेची ग्रामीण भागातील बहुतांशी आरोग्य केंद्रे ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागात आहेत. या आरोग्य केंद्रांमधील बहुतांशी कर्मचारी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातून जातो. त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये कोणी वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, असा विचार करून काही दांंडीबहाद्दर कर्मचारी वेळोवेळी कार्यालयाला दांड्या मारत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रात कर्मचारी नसले की रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी किंवा स्थानिक खासगी दवाखान्यात जावे लागेत.ठाणे जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे यांनी निळजे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.