ठाणे – शहरात येत्या रविवारी म्हणजेच गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागता निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने स्वागत यात्रा निघणार आहे. यंदा या यात्रेचे २५ वे वर्ष असल्यामुळे ‘संस्कृतीचा महाकुंभ’यंदाच्या यात्रेत दिसावा अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त होत असतानाच, यंदा नवनविन संस्था या स्वागत यात्रेसोबत जोडून घेण्यास न्यासाला यश मिळाले आहे.

गेले अनेक वर्ष विविध संस्था, महाविद्यालये तसेच शाळांसह ठाणे महापालिकेच्या काही विभागांचे चित्ररथ स्वागत यात्रेत पाहायला मिळायचे. परंतु, यंदाच्या वर्षी या स्वागत यात्रेत पहिल्यांदाच ठाणे जिल्हा परिषदेचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची जनजागृती केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

ठाणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या शहराची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी विविध संस्था, प्रशासकिय विभाग तसेच लोकप्रतिनिधींच्या मार्फत विशेष प्रयत्न केले जातात. त्यातील एक म्हणजे गेले वर्षानुवर्ष शहरात सुरु असलेली स्वागत यात्रेची परंपरा. ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने २००१ पासून गुढीवाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वागत यात्रा काढली जाते. मराठी संस्कृती, रुढी, परंपरा जपण्याचा प्रयत्न या स्वागत यात्रेच्या मार्फत होत असतो. दरवर्षी या यात्रेसोबत नवनविन संस्था जोडत गेल्या असून आता या यात्रेला भव्य स्वरुप प्राप्त झाले आहे.

शहरातील सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, महाविद्यालये, शाळा तसेच महापालिका प्रशासनाचा देखील या यात्रेत सहभाग असतो. यंदा या यात्रेचे २५ वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत जास्तीत जास्त संस्थांचा सहभाग वाढावा यासाठी न्यासाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. वेळोवेळी संस्थांना करण्यात आलेले आवाहन यामुळे यंदाच्या यात्रेत शहरातील नविन संस्थांचा, शाळांचा आणि महाविद्यालयांचा सहभाग असणार आहे. दरवर्षी विविध संस्थांच्या चित्ररथासह ठाणे महापालिकेच्या वतीने पाणी पुरवठा तसेच पर्यावर विभागाचा चित्ररथ तसेच एसटी महामंडळाची नविन गाडीचा ही सहभाग असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी आणखी एका प्रशासकीय कार्यालयाचा या स्वागत यात्रेत चित्ररथ दिसणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेचा यंदा प्रथमच चित्ररथ स्वागत यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजनांविषयी जनजागृती केली जाणार आहे.