ठाणे : ग्रामीण भागाचा विकास गाडा हाकणारे कार्यालय म्हणून जिल्हा परिषदे कडे पाहिले जाते. मात्र ठाणे जिल्हा परिषदेची ठाणे बाजारपेठेतील मुख्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने सहा वर्षांपूर्वी पाडण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले विभाग निहाय कार्यालय अद्यापही एकच छताखाली आले नाहीत. तर या इमारतीचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून येत्या दोन वर्षात हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सद्यस्थितीत विविध कार्यालय शहराच्या विविध भागातून चालविली जात आहेत. यामुळे नागरिकांसह या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ही या कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे होत आहेत.

ठाणे जिल्ह्याला शहरी भागासह मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग लाभला आहे. याच ग्रामीण भागाचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधला जातो. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, बालके यांच्यासाठी विविध योजना राबविणे. पायाभूत सुविधांची उभारणी करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा यांसारख्या अनेक माध्यमातून जिल्हा परिषद यंत्रणा ग्रामीण भागाचा विकास साधत असते. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची व्याप्ती पाहता जिल्हा परिषद यंत्रणेचे महत्व यात अनन्य साधारण आहे. ठाणे रेल्वे स्थानक जवळील बाजारपेठ परिसरात जिल्हा परिषदेची जुनी इमारत होती.

अनेक वर्ष या इमारतींने सेवा दिल्यानंतर जीर्ण झाल्याने इमारतीच्या मुख्यालयाचा भाग मार्च २०१९ मध्ये पाडण्यात आला. यानंतर उर्वरित लहान इमारतींमध्ये काही विभाग कार्यालय स्थलांतरित करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाचा देखील समावेश होता. यानंतर कृषी, पाणी पुरवठा, स्वच्छ्ता विभाग यांसारखे काही महत्वाचे विभाग शहराच्या मधोमध असलेल्या कोर्ट नाका परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एका इमारतीमध्ये ही कार्यालय स्थलांतरित करण्यात आली. आरोग्य, सामान्य प्रशासन विभाग आणि इतर महत्वाचे विभाग मराठी ग्रंथसंग्रहालय जवळ असलेल्या काही इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. गेले पाच वर्ष या ठिकाणी विभागांचे कार्यालयीन कामकाज चालले. यानंतर गेल्या वर्षी बाजारपेठ परिसरातील इमारतीचा उर्वरित भाग देखील पाडण्यात आला. जिल्हा परिषदेची सर्व विखुरलेली कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी बाजारपेठेतच भव्य अशी प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून या इमारतीच्या उभारणीचे काम सुरू आहे. सुमारे दोन वर्षात ही प्रशासकीय इमारत पूर्णत्वास जाणे नियोजित आहे. मात्र तो पर्यंत आपल्या कामासाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना शहरांच्या विविध भागांमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहे.

सध्या ठाणे शहरातील वागळे इस्टेट या परिसरात जिल्हा परिषदेची इमारत आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या या इमारतीमध्ये आरोग्य विभाग, जलजीवन, पाणी पुरवठा, समग्र शिक्षा, प्राथमिक शिक्षण, महिला बाल कल्याण, पशु संवर्धन, पाट बंधारे, मनरेगा, सामान्य प्रशासन यांसारखे विविध विभाग आहेत. तर शहरातील बि.जे. हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण, स्वच्छ्ता आणि कृषी विभाग यांचे कार्यालय आहे. शहरातील महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे बांधकाम विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान यांसारखे महत्वाचे विभाग कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे.

नागरिकांना जिल्हा परिषदेशी संबंधित कोणतेही कामे असल्यास शहरातील तीन ठिकाणी असलेल्या विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. तर विविध बैठकांसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील या कार्यालयातून त्या कार्यालयात जावे लागते.

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असून सर्व विभाग एकाच छताखाली येतील. यामुळे नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. संदीप चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे