ठाणे : सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाची चर्चा सुरु आहे. हे तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात जाऊन पोहोचले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. प्रशासकीय कामकाजात देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलास कामाला गती मिळेल या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी विशेष कंपनींची निवड करण्यात आली असून त्या कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा दररोजच्या कामकाजात वापर करून कामाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत मंगळवारी बीजे हायस्कूल येथे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात काग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे आणि क्लाऊडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्निल बावा यांनी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, त्यावर काम करण्याची पद्धत, हे तंत्रज्ञान हाताळण्याची प्रक्रिया असे सर्व तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण आत्मसात करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. हे तंत्रज्ञान वापरण्या संदर्भात आणखी अडचणी येत असल्यास त्या दूर करण्यासाठी पुन्हा एकदा प्रशिक्षण वर्ग घेऊ असे आश्वासन देखील घुगे यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिले.
कसे पार पडले प्रशिक्षण
सॉफ्टवेअर डिझाईन, डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी काग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाऊडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्निल बावा यांनी कॅनवा पावर पॉइंट प्रेझेंटेशन, चॅट जी पी टी, क्लॉड, आयडियो ग्राम अशा एआय टूल्स सारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात होणाऱ्या वापराबद्दल उत्तम प्रशिक्षण दिले. यावेळी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले.
कामामध्ये गती, पारदर्शकता आणण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्ता महत्त्वाचे १०० दिवसांचा कृती कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांनी काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर, त्यांच्या कामाला गती मिळेल. कामकाजात गती, पारदर्शकता आणण्यासह लोकोपयोगी कामे उत्तमरित्या करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. या प्रशिक्षणामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामात येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन विभाग.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासकीय कामकाजात सर्वाधिक उपयोग कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर अत्यंत उपयोगी आणि दर्जेदार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा शासकीय कामकाजात सर्वाधिक उपयोग होणार आहे. शासकीय कार्यालयात कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होईल. तसेच कामांमध्ये जास्त पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी असे हे तंत्रज्ञान आहे. गंगाधर बोरकर, कनिष्ठ सहाय्यक लेखा अर्थ विभाग.