ठाणे : संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश द्या यासह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी बुधवारी सामूहिक किरकोळ रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. आंदोलनादरम्यान, ठाणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने यांना मागण्यांचे निवेदन दिले.
राज्य शासनाची प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील धोरणे चुकीची असल्याचा आरोप करत राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात असहकाराची हाक दिली होती. यानुसार ठाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांनी सामुहिक रजा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शिक्षकांच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. आधारवर आधारित संच मान्यता, वीस पटाला एक कायम आणि एक कंत्राटी शिक्षक हे शासनाचे धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप करत त्यास शिक्षक संघटनांसह पालकांनी विरोध केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या निर्णयामध्ये अंशतः बदल करून वीस ऐवजी दहा पटाला एक कंत्राटी शिक्षक, प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थी संख्येवर शिक्षक निश्चिती यासारखे शासन निर्णय निर्गमित केले होते. परंतु शिक्षकांनी आंदोलनावर ठाम राहत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मोफत गणवेश योजना चुकीचे पद्धतीने राबविल्याने गणवेश उशिरा प्राप्त होत आहेत. गणवेश योजना जुन्याच पद्धतीने राबवावी. पाठ्यपुस्तकात कोरी पाने देण्याऐवजी स्वतंत्र वही द्यावी. पोषण आहार योजना स्वतंत्र्य योजनेकडे सोपवावी, याबाबत प्रामुख्याने घोषणाबाजी होत होती.
हेही वाचा ; कल्याणमध्ये ज्योतिष पाहण्याच्या बहाण्याने केबल व्यावसायिकाला लुटले
१५ मार्च २०२४ चा संच मान्यता निर्णय रद्द करा, कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटीत शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करा, शैक्षणिक आणि शैक्षणिक कामाचा शासन निर्णय शिक्षक संघटनांबरोबर चर्चा करून दुरुस्त करा, अशी मागणी ठाणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आली.