लसीकरण अटीचा परिणाम, जिल्ह्यात अद्यापही पहिल्या मात्रेचे प्रमाण ८७ टक्केच
पूर्वा साडविलकर
ठाणे : जिल्ह्यातील काही नागरिकांचे मुंबईत झालेले लसीकरण तर, ग्रामीण तसेच शहरी भागात अद्यापही काही नागरिकांमध्ये असलेला निरुत्साह यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मात्रेचे प्रमाण ९० टक्के पर्यंत पोहोचू शकलेले नाही. आठवडा उलटून गेला तरीही पहिल्या मात्रेचे प्रमाण ८७ टक्केच असल्यामुळे ठाणे जिल्हा अद्यापही निर्बंधातून मुक्त झालेला नाही. जिल्ह्यातील काही पालिका क्षेत्रात लसीकरणाची टक्केवारी जास्त असल्यामुळे जिल्ह्याऐवजी पालिकास्तरावर निर्बंधात सूट देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे दिला आहे.
राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या पहिल्या मात्रेचे प्रमाण हे ९० टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे प्रमाण हे ७० टक्के असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पहिल्या मात्रेचे प्रमाण हे ८७ टक्के असल्यामुळे मागील आठवडय़ात जिल्ह्यातील काहीच निर्बंध शिथिल करण्यात आले होते. एक आठवडा उलटून गेला तरीही लसीकरण प्रमाणात फारशी वाढ झालेली नसून हे प्रमाण ८७ टक्के इतकेच आहे. यामुळे ठाणे जिल्हा शिथिलीकरणापासून वंचित राहिला आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २४ ते २५ हजाराच्या आसपास लसीकरण होत आहे. परंतु, यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांचे असून जिल्ह्यात आतापर्यंत ७२ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा मिळाली आहे.
जिल्ह्यातील ७३ लाख ४६ हजार ७९२ लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ६८ लाख ११ हजार २८२ नागरिकांना लशीची पहिली तर ५५ लाख ६९ हजार ४७१ नागरिकांना लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. जिल्ह्यातील नागरिक हे मुंबई शहरात नोकरी निमित्ताने जातात. यामध्ये बहुतांश नागरिक हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला मुंबईतील कार्यालयात या नागरिकांना लस मिळाली आहे. परंतु, या नागरिकांची नोंद ठाणे जिल्ह्यात झालेली नाही. तर, दुसरीकडे आजही एक समूह असा आहे की तो लस घेण्यास तयार नाही. परिणामी, जिल्ह्यातील पहिल्या मात्रेचे प्रमाण हे अद्यापही ८७ टक्के इतकेच आहे.
जिल्हा प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
ग्रामीण भागातील आदिवासी तसेच दुर्गम पाडय़ांमध्ये मोबाइल व्हॅन किंवा लसवाहिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, करोनाच्या तिसऱ्या लाटेत फिरते लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना करोना काळजी केंद्रावर पाठविण्यात आल्यामुळे हे सत्र काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून ही लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. तसेच गावांमध्ये जाऊन आरोग्य सेविकांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
शिथिल झालेले निर्बंध
राष्ट्रीय उद्याने, पर्यटनस्थळे आणि सफारी नियमित वेळेत खुले राहतील. स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. परंतु केशकर्तनालयांना लागू असलेले नियम स्पासाठी लागू असतील. अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल. तर रात्रीची संचारबंदी, जमावबंदीसह उर्वरित नियम पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लशीच्या पहिल्या मात्रेचे ९० टक्के प्रमाण अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला निर्बंधांतून दिलासा मिळालेला नाही. परंतु, जिल्ह्यानिहाय नव्हे तर महापालिका स्तरावर लसीकरणाचा अहवाल पाहून निर्बंध शिथिल करण्याची विनंती राज्य शासनाकडे केली आहे.
– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.