अपेक्षा ठाणेकरांच्या

दिवस निवडणुकांचे असल्याने आता शहराच्या गल्लीबोळात स्थानिक पुढारी विकासाच्या गप्पा मारत फिरत आहेत. आश्वासनांची गाजरे आणि स्वप्नांची खैरात करू लागले आहेत. प्रत्यक्षात मावळत्या लोकप्रतिनिधी राजवटीतील काही अपवाद वगळले तर बहुतेकांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उपाय सोडा, साधे भाष्य करणेही टाळले. दुसरीकडे कोणताही राजकीय अजेंडा नसलेल्या परंतु शहर विकासाची तळमळ असणाऱ्या जागृत नागरिकांनी वेळोवेळी सामान्य जनतेचे जगणे अधिक सुसह्य़ व्हावे, यासाठी यशस्वी प्रयत्न केले. ‘करून दाखविले’ असा कोणताही बडेजाव न करता शहर स्मार्ट करण्यासाठी अनेक मंडळी शहरात कार्यरत आहेत. त्यापैकी काहींची ही मनोगते..

पाण्याची सहज आणि मुबलक उपलब्धता ही कोणत्याही शहराची अगदी प्राथमिक गरज असते. दुर्दैवाने महाराष्ट्रातील एक मोठे महानगर असलेल्या ठाणे शहराच्या मालकीचे सध्या तरी एकही मोठे धरण नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ठाणे तसेच जिल्ह्य़ातील इतर शहरांसाठी प्रस्तावित असलेली पोशीर, शाई आणि काळू ही धरणे अद्याप कागदावरच आहेत.स्थानिकांचा विरोध, पर्यावरणाचे प्रश्न आणि वाढता खर्च यामुळे भविष्यात मोठी धरणे बांधणे अव्यवहार्य ठरणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. हे सर्व प्रश्न आणि अडचणी मिटून उपरोक्त प्रकल्पांपैकी एखादा आता लगेच मार्गी लागला, असे जरी गृहीत धरले तरी प्रत्यक्षात धरण उभारून त्यातून पाणीपुरवठा सुरू होण्यात पुढील किमान दहा वर्षे लागतील. ठाणे शहराची आताची परिस्थिती पाहता मागणीच्या तुलनेत पाण्याचा पुरवठा अतिशय कमी आहे. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसाने ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. यंदा पुरेसा पाऊस पडूनही एक दिवस पाणी कपात करावी लागली. भविष्यात जलसंवर्धनाचे उपाय योजले नाहीत, तर ठाण्याचा मराठवाडा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा गेल्याच आठवडय़ात उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देताना दिला आहे. त्यामुळे धरणाच्या आग्रहापेक्षा जलसंवर्धनाचे धोरण तातडीने अमलात आणणे गरजेचे आहे.

ठाणे परिसरात सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी पाऊस पडतो. त्यामुळे प्रत्येक सोसायटीने इमारतीच्या गच्चीवर साचणारे पावसाचे पाणी वाहिन्यांद्वारे जमिनीत मुरवले तर निश्चितच भूजलसाठा वाढेल. एक बहुमजली इमारत सर्वसाधारणपणे वर्षां जलसंचलन प्रकल्पाद्वारे सरासरी २० लाख लिटर पाणी साठवू शकते. मात्र उदासीनता आणि अनभिज्ञतेमुळे पावसाळ्यात कोटय़वधी लिटर्स पाणी आपण वाया घालवत आहोत.

शहरातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागातील नागरिकांचे याबाबतीत प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रत्येक इमारतीने जलसंधारण प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण भूगर्भात साठविलेल्या पाण्यातून जवळपास २५ ते ३० टक्के पाणी मिळू शकते. शौचालय, उद्याने आणि गाडय़ा धुण्यासाठी हे पाणी वापरले जाऊ शकते. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत पर्जन्य जलसंधारण केलेल्या प्रकल्पांची संख्या अतिशय कमी आहे. २००५ पासून शासनाने नव्या इमारतींना पर्जन्य जलसंधारण योजना अनिवार्य केली आहे. या प्रकल्पांची पूर्तता केल्याशिवाय महापालिका प्रशासन सोसायटीला वापर परवाना देत नाही. त्यामुळे नव्या इमारतींमध्ये जलसंधारण प्रकल्प राबविले जातात, पण ते योग्यप्रकारे कार्य करतात का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे एखाद्या त्रयस्थ संस्थेतर्फे या प्रकल्पांची तपासणी होणे आवश्यक आहे. अर्थात नव्या इमारतींप्रमाणेच शहरातील जुन्या इमारतींनीही जलसंधारण प्रकल्प मोठय़ा प्रमाणावर राबवायला हवेत. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने अभियान राबवून अशा उपक्रमांना प्रोत्साहित करायला हवे. ठाणे जसे तलावांचे शहर आहे, तसेच ते विहिरींचेही आहे. दुर्दैवाने नळपाणी योजना सुरू झाल्यापासून विहिरींकडे दुर्लक्ष केले गेले. काही विहिरी विकासाच्या रेटय़ात बुजविल्या गेल्या. नामशेष झाल्या. मात्र तरीही अद्याप शहरात शेकडो विहिरी आहेत. त्या विहिरींची डागडुजी करून घेतली तर परिसरातील नागरिकांना एक हक्काचा जलस्रोत उपलब्ध होईल. ठाणे शहराच्या तिन्ही बाजूला खाडी आहे. शहरातील तलाव आणि विहिरींच्या संवर्धनाकडे अशीच डोळेझाक केली तर भूजल पातळी आटून त्याजागी खारे पाणी भरेल. ठाण्याच्या काही भागात असा अनुभव आला आहे. त्यामुळे पर्जन्य जलसंधारणाद्वारे भूजलाचे पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ठाणे शहरासाठी एखादे नवे धरण होईल तेव्हा होईल, पण योग्य धोरणाचा अवलंब केला तर सद्य:स्थितीतही किमान २५ ते ३० टक्के अधिक पाणी आपण सहज मिळवू शकतो.

 

विहिरी पुन्हा भरल्या

वहन आणि वितरण व्यवस्थेतील दोष तसेच चोऱ्यांमुळे दररोज २५ ते ३० टक्के पाणी वाया जाते. जागृत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संयुक्त समित्या स्थापन करून देखरेख ठेवली तर गळतीचे प्रमाण किमान १० ते १५ टक्क्य़ांवर आणणे सहज शक्य आहे. ठाणे शहरात रोटरीच्या माध्यमातून आम्ही जल संधारणाची कामे करतो. त्यासाठी निरनिराळे गट काम करतात. यासंदर्भात मार्गदर्शनही करतो. ज्या भागातून मुंबई-ठाणेकरांचे पाणी येते, त्या ठाणे-पालघरच्या ग्रामीण भागात पाण्याची बोंब आहे. आम्ही रोटरीच्या वतीने गेल्या चार वर्षांत त्या भागात ४०० हून अधिक काँक्रीटचे बंधारे बांधले. त्यामुळे भूजल पातळी वाढून त्यांच्या कोरडय़ा झालेल्या विहिरी पुन्हा पाण्याने भरल्या.

हेमंत जगताप

शब्दांकन- प्रशांत मोरे

Story img Loader