विघ्नेश जोशी हे नाव नाटक-मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे आहे. सध्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील सतीश दुसाने या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना ठाऊक आहे. मुख्यत्वे साहाय्यक भूमिकांमधून त्याच्या अभिनयाची झलक, प्रसन्नपणा याची ओळख प्रेक्षकांना असते. अभिनयाबरोबरच निरनिराळ्या कार्यक्रमांची संकल्पना ठरविणे, आखणी करून कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये कार्यरत विघ्नेश उत्तम हार्मोनियम वादन करतो. मालिकांमधील छोटय़ा छोटय़ा भूमिकांबरोबरच ‘वाऱ्यावरची वरात’, ‘कॅरी ऑन काका’ यांसारख्या नाटकांमधून तो महत्त्वाच्या भूमिका करतो आहे. ‘बेचकी’ हे त्याचे नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर अवतरणार आहे. ‘हसत खेळत’ हा कवितांवर आधारित वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम विघ्नेश, त्याची पत्नी कल्याणी, मुलगा यश तसेच विजय गोखले, प्रदीप पटवर्धन यांच्या साथीने तो सादर करतो. ‘आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमाद्वारे लोकांपर्यंत महत्त्वाच्या कवींच्या कविता पोहोचविण्याचे काम विघ्नेश जोशीने केले आहे.
’आवडते मराठी लेखक – व. पु. काळे, पु. ल. देशपांडे
’आवडते मराठी नाटककार – वसंत कानेटकर, विद्याधर गोखले, बाळ कोल्हटकर
’आवडते संगीतकार – बाबूजी फार जवळचे, हृदयनाथ मंगेशकर
’आवडते संगीत नाटक – पंडितराज जगन्नाथ, संगीत सौभद्र
’आवडता मराठी चित्रपट – धूमधडाका
’आवडती कविता – प्रमोद जोशी यांची ‘खमंग येता वास भज्यांचा’ ही कविता
’आवडते कवी – मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज
’आवडता खाद्यपदार्थ – मिसळ
’आवडतं शॉपिंगचं ठिकाण – शॉपिंग हा विभाग बायकोकडे आहे.
’आवडते फूडजॉइण्ट्स – आमंत्रण, मामलेदार, भगवानची मिसळ
’आवडतं हॉटेल-रेस्टॉरण्ट – मोनीज
’ठाणे शहर-परिसराविषयीचे मत – प्रत्येक ठाणेकराची मानसिकता बदलायला हवी. स्वागतयात्रेला लोक मोठय़ा संख्येने जमतात. परंतु, त्यानंतर होणारी अस्वच्छता साफ करायला हाक दिली तर किती लोक जमतील, हा प्रश्न मनात येतो. ठाण्याच्या रस्त्यांवरून फिरताना श्वास कोंडतो. म्हणून प्रत्येक ठाणेकराने आपले शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नपूर्वक एकत्र यायला हवे. आनंदनगरच्या चेकनाक्यापासून पवईजवळील सीब्जपर्यंत अनेक ठाणेकरांना जावे लागते. समजा, चेकनाक्यावरील रिक्षा युनियन आणि प्रवासी युनियन यांनी एकत्र येऊन शेअरिंग रिक्षा ७०-८० रुपयांत सुरू केली तर अनेक ठाणेकरांना स्वत:च्या वाहनाने न जाता वेळ-पैसा-इंधन वाचविता येऊ शकेल, अशा महत्त्वाच्या गोष्टी करता येऊ शकतात. याबाबत माझ्यासह प्रत्येक ठाणेकराने निदान शहर अधिकाधिक स्वच्छ, सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मनापासून वाटते.
’ठाण्याचे सांस्कृतिक जीवन – आपल्या शहराचे सांस्कृतिक विश्व समृद्ध नक्कीच आहे. नाटक, गाणं, संगीत सर्वच कलांना पोषक असे वातावरण, त्यासाठी काम करणाऱ्या उत्तमोत्तम संस्था, त्याबाबत दूरदृष्टी बाळगून काम करणारे अनेक लोक आपल्या शहरात आहेत. ही चांगलीच बाब आहे. परंतु, त्याचबरोबर ज्याप्रमाणे सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीसाठी कार्य केले. त्याप्रमाणे पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुलामुलींवर भाषेचे संस्कार व्हावेत यासाठी काही ठोस करण्याची नितांत गरज वाटते. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचे वाचन त्यांच्यासमोर करून त्यांच्याकडूनही अशा पुस्तकांचे, मजकुराचे वाचन करवून घेणे, त्यांना भाषेची गोडी लावण्याचा कसोशीने प्रयत्न करणे यासाठी निश्चित स्वरूपाचा काही उपक्रम करण्याची गरज आहे. तर त्यातून भाषाप्रेमी, भाषेबाबत सजगता बाळगणारी मुले तयार होतील.
’ठाणे जिल्ह्य़ातील पिकनिक स्पॉट – बारवी धरण
’आवडता छंद- विरंगुळा – हार्मोनियम वाजवतो, वाचन करतो
’सध्या वाचत असलेली पुस्तके – गौरी देशपांडे लिखित ‘गोफ’, आचार्य अत्रे लिखित ‘कऱ्हेचे पाणी’
’ठाण्याबद्दलची संस्मरणीय गोष्ट – या वर्षी दिवाळी पहाटला माझ्या मुलाने कविता सादर केली. चक्क त्या कवितेला वन्स मोअर मिळाला. ‘शब्दासुरांशिवाय जगणं म्हणजे जीवघेणी सजा’ ही कविता त्याने सादर केली होती. तेव्हा खूप आनंद झाला. अलीकडेच सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघासाठी कार्यक्रम केला, त्या वेळी एका आजीबाईंनी गोविंदराव पटवर्धनांचा शिष्य आहेस तर हार्मोनियमवर काही सादर कर, अशी विचारणा केली आणि म्हणून ‘नारायणा रमारमणा’ हे ‘जय जय गौरीशंकर’ या विद्याधर गोखले यांच्या नाटकातील पद सादर केले.
– संकलन : सुनील नांदगावकर
तारांकीत : ठाणेकरांनी एकत्र येऊन शहर स्वच्छ-सुंदर करायला हवे
विघ्नेश जोशी हे नाव नाटक-मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे आहे. सध्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील सतीश दुसाने या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना ठाऊक आहे.
![तारांकीत : ठाणेकरांनी एकत्र येऊन शहर स्वच्छ-सुंदर करायला हवे](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/02/tv16122.jpg?w=1024)
First published on: 28-02-2015 at 12:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanekar should come together to make clean and beautiful city says vighnesh joshi