वैज्ञानिक संकल्पना केवळ पुस्तकातील अभ्यासापुरत्या मर्यादित राहू नयेत तर त्यांचा वापर प्रत्यक्ष शहरांच्या विकासासाठी व्हावा या उद्देशानेच ठाणे शहरात असे प्रयोग गेल्या २२ वर्षांहून अधिक काळापासून होत आहे. नव्या वर्षांतही या प्रयोगांमध्ये नावीण्य आणि कल्पकता येत आहे. केवळ वैज्ञानिकच नव्हे तर कला, साहित्य, पर्यावरण, ऊर्जानिर्मिती या सगळ्याच क्षेत्रांमध्येही ठाणेकर यशस्वी वाटचाल करत आहेत. शहरातील एका छोटय़ा कट्टय़ावरून ‘सिंड्रेला’सारखा सिनेमा तयार झाला तर वंचित घटकांना रंगभूमीवर कला सादर करण्याची संधी देणारा ‘वंचितांचा रंगमंच’ या संकल्पनेलासुद्धा ठाण्यातून सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर कलात्मक आणि वैज्ञानिक प्रयोगांची फॅक्टरी बनू लागली आहे.
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव.. कृत्रिम तलावातील गणेश विसर्जन.. वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई.. वाढते ध्वनिप्रदूषण.. नष्ट होत चाललेली जैवविविधता.. ठाणे खाडीतले नष्ट होणारे मासे.. आदिवासींच्या जीवनशैलीस उपयुक्त ऊर्जा स्रोतांचा शोध.. कुपोषणाचा अभ्यास.. रायलादेवी तलावाची स्वच्छता अशी सगळी कामे खरे तर स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिकेने करणे अपेक्षित असते. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ठाणे शहरातील ही सगळी कामे ठाणे महानगरपालिकेने पूर्ण केली आहेत. असे असले तरी त्यांना आवश्यक असलेली प्रेरणा मात्र ठाण्यातील बालवैज्ञानिकांच्या राष्ट्रीय पातळीवर मांडलेल्या प्रकल्पातून मिळाल्याचे दिसून येते. वैज्ञानिक संकल्पना केवळ पुस्तकातील अभ्यासापुरत्या मर्यादित राहू नयेत तर त्यांचा वापर प्रत्यक्ष शहरांच्या विकासासाठी व्हावा या उद्देशानेच ठाणे शहरात असे प्रयोग गेल्या २२ वर्षांहून अधिक काळापासून होत आहेत. नव्या वर्षांतही या प्रयोगांमध्ये नावीण्य आणि कल्पकता येत आहे. केवळ वैज्ञानिकच नव्हे तर कला, साहित्य, पर्यावरण, ऊर्जानिर्मिती या सगळ्याच क्षेत्रांमध्येही ठाणेकर यशस्वी वाटचाल करत आहेत. शहरातील एका छोटय़ा कट्टय़ावरून ‘सिंड्रेला’सारखा सिनेमा तयार झाला तर वंचित घटकांना रंगभूमीवर कला सादर करण्याची संधी देणारा ‘वंचितांचा रंगमंच’ ही संकल्पनेलासुद्धा ठाण्यातून सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर कलात्मक आणि वैज्ञानिक प्रयोगांची फॅक्टरी बनू लागली आहे.
विज्ञानातील संशोधन हे केवळ प्रयोगशाळेतील कृती, निरीक्षण आणि निष्कर्षांपुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात झाला तरच विज्ञान प्रयोगाचे फलित हाती आले असे म्हणता येऊ शकते. १९९२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देत त्यांच्यातील बालवैज्ञानिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये आपले योगदान दिले आहे. या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर सादर केलेल्या प्रयोगातून शहरातील नागरिकांना प्रेरणा मिळाली आणि शहरातील अनेक भागांमधील समस्या लक्षात घेऊन त्यामध्ये मूलभूत सुधारणा करण्याची गरज जाणवली. त्यामुळेच या बालवैज्ञानिकांच्या संशोधनाच्या आधारे शहरातील जागरूक नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीने शहरामध्ये अनेक सुधारणा करूनही घेतल्या आहेत.
जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने १९९५ मध्ये राष्ट्रीय विज्ञान परिषदेमध्ये पहिल्यांदाच ठाण्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या वेळी स्वच्छ भारत या संकल्पनेवर शंतनू घारपुरे या विद्यार्थ्यांच्या गटाने मासुंदा तलाव परिसरातील फेरीवाला क्षेत्रातील विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या गुणवत्तेची तपासणी केली होती. या भागात मिळणारे अन्नपदार्थ अत्यंत दूषित असल्याचे निरीक्षणात त्यांना आढळले होते. या प्रयोगानंतर या प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सादर करत या भागातील दूषित अन्नपदार्थावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांत यावर कारवाई करण्याचे आश्वासनही या विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र ते त्यांनी पुढे पाळलेच नाही.
अखेर याप्रकरणी सामाजिक संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर प्रशासनाने या भागातील उघडय़ावरच्या पदार्थ विक्रीवर कारवाई सुरू केली. बालवैज्ञानिकांच्या या प्रयोगाचे हे पहिले यश होते. ‘वाहतूक नियम तोडना चलता है..’ हा गैरसमज दूर करण्यातही या बालवैज्ञानिकांचे मोठे योगदान आहे. अमृता नवरंगे या मुलीने महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नोंदी ठेवत वाहतूक पोलिसांना जाब विचारला. त्यामुळे या रस्त्यावरील अवजड वाहतूक, नियमांचे उल्लंघन थांबले. गणेशमूर्ती विसर्जनामुळे मासुंदा तलावावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास निरंजन करंदीकर यांच्या गटाने केला होता. या अभ्यासात तलावाचे गणेशोत्सव काळातील प्रदूषण समोर आल्यानंतर जिज्ञासा ट्रस्ट, अंधश्रद्धा निर्मूलन संस्थांनी केलेल्या संयुक्त चळवळीनंतरच सुमारे चार वर्षांच्या लढाईनंतर शहरामध्ये कृत्रिम तलावांची संकल्पना उदयास आली. पुढे संपूर्ण महाराष्ट्रात ती संकल्पना स्वीकारली गेली.
कलेच्या क्षेत्राताही कल्पक प्रयोग..
नाटक आणि अभिनय शिकण्याच्या उद्देशाने शहरातील कट्टय़ावर जमणाऱ्या हौशी कलाकारांनी २०१५ या वर्षांत चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण करत ‘सिंड्रेला’ या चित्रपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने व्यावसायिक चित्रपटाच्या तोडीची कमाई केल्याने सगळ्यांच क्षेत्रातून या चित्रपटावर कौतुकांचा वर्षांव झाला आहे. कट्टय़ावर जमणाऱ्या हौशी कलाकारांनी चित्रपट साकारण्याचा हा पहिलाच प्रयत्न ठाण्यातून झाला आणि त्याला यशसुद्धा मिळाले आहे. सिंड्रेलाच्या निमित्ताने हौशी कलाकारांना मोठय़ा पडद्यावर चमकण्याची संधीही मिळाली. तशीच संधी ‘वंचितांचा रंगमंच’ या संकल्पनेच्या आधारे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी ठाण्यातील गरीब वस्तीतील मुलांना मिळवून दिली. ठाणे शहरातील झोपडपट्टी, वंचित पाडे, वस्त्यांवरील मुलांमध्ये अभिनयाची चुणूक असली तरी त्यांना संधी नसल्याने ही कला समाजासमोर येत नव्हती. रत्नाकर मतकरी आणि त्यांच्या संस्थेने ‘वंचितांचा रंगमंच’ या संकल्पनेच्या निमित्ताने या मुलांना गडकरी रंगायतनसारख्या मोठय़ा रंगमंचावर आणि मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीमध्ये कला सादर करण्याची संधी निर्माण करून दिली. त्यामुळे वंचित वस्तीतील मुलांना अभिनयाची संधी तर मिळालीच शिवाय रंगमंचावर वेगवेगळ्या विषयांची हाताळणीही विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे केली. त्यातून व्यसनाधीनता, शहरातील अस्वच्छता, महिलांवरील अत्याचार, अंधश्रद्धा आणि अशिक्षितत यांसारख्या शहरापुढील समस्या नागरिकांसमोर आणण्यास मदत झाली. याच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘काचमुक्त येऊर’ या नाटिकेतून मकरंद अनासपुरे यांनी येऊर स्वच्छतेची हाक दिली. तर आमदार संजय केळकर यांनी नागरिकांच्या मदतीने येऊर परिसरात ‘काचमुक्तीची मोहीम’ राबवून येऊर स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू केला.
शहरासाठी उपयुक्त ठरलेले प्रकल्प..
ठाणे खाडीतील कमी होणाऱ्या माशांची संख्या, उत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषण, कुपोषणाच्या कारणांचा शोध, शाळेमध्ये डब्यातून विद्यार्थ्यांना मिळणारे पोषक घटक, विजेची बचत, उपयुक्त नसलेली कचरापेटी, रायलादेवी तलाव परिसराचा अभ्यास असे विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार केले होते आणि त्याच्याच आधारे महापालिकेने सकारात्मक निर्णय घेतले. सरस्वती विद्यामंदिर, शारदा मंदिर, सुलोचनादेवी सिंघानिया या शाळांमधील विद्यार्थी अनेक संशोधनात्मक प्रकल्प सादर करत असून त्यांच्या बरोबरीने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे प्रकल्पही दैनंदिन उपयुक्त ठरत आहेत.
सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचा संकल्प..
विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने बुलढाणा ते ठाणे व्हाया आयआयटी असा प्रवास करणाऱ्या पुरुषोत्तम पाचपांडे यांनी ‘चिल्ड्रन्स टेकसेंटर’ची स्थापन केली आहे. ठाणे शहरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या रोबो लॅब संकल्पनेशी जोडले असून त्या माध्यमातून यंदा सौर ऊर्जानिर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. ‘चिल्ड्रन्स टेकसेंटर’ या संस्थेने यापूर्वी महिलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने स्वयं संरक्षणासाठी चपला, बोलणारा आकाश कंदील आणि प्रसाद वाटणारा उंदीर अशा छोटय़ा प्रकल्पांची निर्मिती केली आहे. समाजाला त्याचा उपयोग होईल या दृष्टीने या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुटे साहित्य देऊन ते प्रकल्प बनवून घेतले जातात. यंदा या संस्थेने सौर ऊर्जेच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देणाऱ्या प्रयोगांची हाताळणी सुरू केली आहे. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत सौर ऊर्जेवर आधारित कंदिलांची निर्मिती या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केले होते. याशिवाय सौर ऊर्जेवरील दिवे, पंखा अशा वस्तूंची निर्मिती करून त्यांचा वापर होण्यासाठी जागृतीही केली जात आहे. याच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा या उद्देशाने ‘सोलर ट्रॅकिंग सिस्टीम’ अर्थात सूर्याचा माग काढत फिरणारी यंत्रणा तयार केली आहे. सूर्याची आकाशामध्ये सरकण्याची प्रक्रिया लक्षात घेऊन त्यानुसार आपली योग्य जागा ठरवण्याचा निर्णय ही यंत्रणा आपोआप घेत असल्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय जास्तीत जास्त ऊर्जानिर्मिती होण्यास मदत होऊ लागली आहे. या पुढेही वैज्ञानिक संकल्पनांचा शहरी जगण्यात जास्तीत जास्त चांगला उपयोग होऊ शकेल असे प्रयोग ‘चिल्ड्रन्स टेकसेंटर’च्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे ठाणेकरांना पुढील वर्षांमध्ये असेच नवे प्रकल्प पाहायला नक्की मिळू शकता.