बदलापूर : सप्टेंबर महिन्यात अवघ्या १५ दिवसात पावसाने सरासरी ओलांडल्यानंतर या आठवड्यात तापमानात निचांकी नोंद झाली. गुरूवारी सकाळपासूनच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व शहरांमध्ये गारवा जाणवत होता. तर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात कमी तापमानाची नोंद बदलापुरात झाली. गुरूवारी बदलापुरात वर्षातील सर्वात कमी म्हणजे २३.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पुणे आणि नाशिकच्या तापमानापेक्षाही कमी तापमान गुरूवारी मुंबईत आणि इतर शहरात नोंदवले गेले. त्यामुळे पावसाळ्यात हिवाळ्याचा अनुभव येत होता. गुरूवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळीही गारवा जाणवत होता.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले. गेल्या पंधरवड्यात झालेल्या संततधार पावसाने काही अंशी रिकामे झालेले जलस्त्रोत पुन्हा काठोकाठ भरले आहेत. तर याच पावसाने संपूर्ण संप्टेंबर महिन्याची सरासरी अवघ्या पंधरा दिवसातच ओलांडल्याचेही दिसून आले होते. हा पाऊस नवरात्रोत्सवातही पडणार की काय अशी शक्यता असतानाच गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा गारवा जाणवतो आहे. गुरूवारी दिवसभर आणि शुक्रवारी पहाटे हा गारवा अनुभवास आला. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सरासरी २५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. यात सर्वात कमी नोंद बदलापुरात झाली.
हेही वाचा : ठाणे : अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
बदलापुरात यंदाच्या वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद २२ सप्टेंबर रोजी झाली. गुरूवारी बदलापुरचे तापमान अवघे २३.७ अंश सेल्सियस इतके होते. थंड वातावरणासाठी ओळखले जाणारे नाशिक आणि पुणे शहरापेक्षा बदलापूर शहराचे तापमान कमी होते अशी माहिती कोकण हवामान या खासगी हवामान अभ्यासक गटाचे अभिजीत मोडक यांनी दिली. गुरूवारी नाशिकचे तापमान २४.७ तर पुण्याचे तापमान २८.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्याचवेळी मुंबईचे तापमान अवघे २५.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्यामुळे पुण्या नाशिकपेक्षा मुंबईत अधिक गारवा होता.
हेही वाचा : कल्याणमधील भातसा नदीच्या पाण्यावर रासायनिक सफेद रंगाचा तवंग
गारवा कशामुळे
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी आहे. त्याचवेळी वाऱ्याला गती नसल्याने हे काळे ढग जमिनीपासून अवघ्या ३०० ते ४०० फुटांवर तरंगताना दिसतात. त्यामुळे पाऊस पडेल असे वाटते. त्यात आर्द्रतेच्या असण्याने स्थानिक पातळीवर शहरांचे तापमान कमी होते आहे, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
इतर शहरांचे तापमान
कल्याण २४.२
डोंबिवली २४.२
ठाणे २४.३
कोपरखैरणे २४.३
बेलापूर २४.९
मुंबई २५.१
वाशी २५.४