ठाणे : ठाण्यातील निळकंठ भागात वाहनांच्या छतावरून काही हुल्लडबाज तरुणांनी फटाक्यांचा खोका हातात पकडून फटाक्यांची आतषबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतषबाजी करताना कार देखील चालविली जात होती. या याप्रकरणाचे चित्रिकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…दर्यापुरात ‘युवा स्वाभिमान’ च्या, पोस्टरवर भाजप जिल्हाध्यक्षाची छबी…!
निळकंठ भागात दिवाळी सणाच्या दिवशी मोटार वाहनाच्या छतावर उभे राहून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, तरुणांनी हातामध्ये फटाक्यांचा खोका पकडला होता. वाहन चालवित असताना ही आतषबाजी केली जात होती. अखेर याप्रकरणाची दखल घेत चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.