लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : मी राज्यात जेव्हा मोठा कार्यक्रम केला. तेव्हा भाजपच्या वरिष्ठांना सांगितले की, मी माझे काम केले आहे, आता तुम्ही तुमचे काम करा. त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांना भाजपचे २० ते २५ आमदार फोडायचे होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी सर्व गमावले. सोन्यासारखी माणसे सोडून गेली. पक्ष हातातून गेला. बाळासाहेबांचे विचार गेले. पण, मी स्वत:ला भाग्यवान समजतो. धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार आणि जनता आमच्यासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही सांगतात की, असली शिवसेना एकनाथ शिंदे यांची तर, नकली शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
चार ते पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचा उद्धव ठाकरे यांची योजना होती. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. याबाबत उद्धव ठाकरे यांनी मला स्वतः सांगितले होते. देवेंद्र, त्यांचा भाऊ आणि पत्नीची प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. आता देवेंद्र यांना सोडत नाही, त्यांना जेलमध्येच घालतो, असे उद्धव ठाकरे हे मला म्हणाले होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावला जाणार होता. त्यावर मी उद्धव ठाकरे यांना सागितले की, असे करणे योग्य नाही. त्यावर ते म्हणाले, मला करायचे आहे, भाजपला घाबरवायचे आहे, त्यांच्या लोकांना जेलमध्ये टाकायचे आणि भाजपचे २० ते २५ आमदार फोडायचे आहेत, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांची ही सर्व योजना यशस्वी झाली, तर माझा योजना अयशस्वी झाली असती, असेही ते म्हणाले.
काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ…
जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो, तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो, तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना त्यांनी काश्मिरबाबत बोटचेपी धोरण ठेवले. कॉंग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. यामुळेच ‘काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ’ अशी टिका मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असे बोलून कोणी हिंदू होत नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलेच धुतले असते, असेही ते म्हणाले.
म्हणून ठाणे मिळाले
ठाणे लोकसभेची जागा आम्हाला मिळणार नाही, असे सगळ्यांना वाटत होते. पण, मी भाजपच्या वरिष्ठांना सांगितले की, आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाण्याबाबत आमच्या वेगळ्या भावना आहेत. आनंद दिघे यांच्या संवेदना आहेत. यामुळेच आम्हाला ठाणे मिळाले, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे मोठ्या मनाचा
शिवसेना कार्याध्यक्ष पदाची नेमणुक होणार होती. त्यावेळेस राज ठाकरे यांनी पक्षासाठी मेहनत केली आहे, त्यांचा विचार करावा, असे मत आनंद दिघे यांनी व्यक्त केले होते. त्यावर त्यांना अनेक फोन आले आणि त्यानंतर दिघे हे गाडीत बसून निघून गेले. दोन दिवस कुणालाच भेटले नव्हते. एवढे त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. या मागे कोण होते, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत राज ठाकरे हे कोत्या नाही तर, मोठ्या मनाचे असल्याचे म्हटले.